विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने वेस्ट इंडिज दौऱ्यावर आपलं पूर्णपणे वर्चस्व गाजवलं. टी-२०, वन-डे पाठोपाठ कसोटी मालिकेतही भारताने यजमान वेस्ट इंडिजला व्हाईटवॉश दिला. किंग्जस्टन, जमैकाच्या मैदानात खेळवण्यात आलेल्या दुसऱ्या सामन्यात भारताने बाजी मारली. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाचा हा २८ वा विजय ठरला आहे. याआधी धोनीने भारताला २७ कसोटी सामन्यांमध्ये विजय मिळवून दिला होता. विराटने धोनीचा हा विक्रम आता आपल्या नावे केला आहे.

विराट कोहलीसाठी भारतीय संघाचा हा विजय अतिशय महत्वाचा मानला जात आहे. २०११ साली याच मैदानावर विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. त्याच मैदानावर तब्बल ८ वर्षांनी विराट भारताचा कसोटी क्रिकेटमधला यशस्वी कर्णधार ठरला आहे. किंग्जस्टनच्या मैदानावर विराट कोहलीने पहिल्या डावात ७६ धावांची खेळी केली, मात्र दुसऱ्या डावात त्याला भोपळाही फोडता आला नाही.

माजी कर्णधार धोनीने ६० कसोटी सामन्यात भारताला २७ सामने जिंकून दिले होते. कोहलीने ४८ व्या सामन्यात २८ वा विजय साजरा करत नवा विक्रम नावे केला आहे. विराट कोहली आशिया खंडातील सर्वात यशस्वी कर्णधार ठरला आहे. याशिवाय ४८ सामन्यात सर्वात कमी पराभाव विराट कोहलीने पाहिले आहेत. कर्णधार म्हणून कोहलीने आपल्या कसोटी कारकीर्दीत फक्त दहा सामने गमावले आहेत. २०१४ मध्ये विराट कोहलीने भारतीय संघाची सुत्रे सांभाळली होती. या विजयासह भारताचे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये एकूण १२० गुण झाले आहेत. गुणतालिकेत भारत अव्वल स्थानावर आहे.