Sanju Samson On His Missed Centuries: आयसीसी टी -२० वर्ल्डकप २०२६ स्पर्धेतील दुसऱ्या सेमी फायनलचा सामना भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये पार पडला. या सामन्यात भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना २५३ धावा केल्या होत्या. इंग्लंडला हा सामना जिंकण्यासाठी २५४ धावा करायच्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना इंग्लंडने २४६ धावांपर्यंत मजल मारली. त्यामुळे इंग्लंडचा संघ विजयापासून अवघ्या ७ धावा दूर राहिला. यासह भारतीय संघाने सलग दुसऱ्यांदा टी -२० वर्ल्डकप स्पर्धेतील अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. या सामन्यातही संजू सॅमसनने दमदार खेळी केली होती. त्याचं शतक थोडक्यात हुकलं. दरम्यान पत्रकार परिषदेत शतक हुकण्याबाबत प्रश्न विचारण्यात आला, त्यावेळी त्याने मजेशीर उत्तर दिलं.

याआधी सुपर ८ फेरीतील शेवटच्या सामन्यात भारत आणि वेस्ट इंडिज हे दोन्ही संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात धावांचा पाठलाग करताना संजू सॅमसनने नाबाद ९७ धावांची खेळी केली होती. त्यामुळे त्याचं शतक थोडक्यात हुकलं होतं. आता इंग्लंडविरुद्ध खेळताना तो ८९ धावांवर बाद झाला.

संजूकडे लागोपाठ २ शतकं झळकावण्याची संधी होती. पण ही संधी थोडक्यात हुकली. शतक हुकण्याबाबत विचारण्यात आलेल्या प्रश्नाचं उत्तर देताना संजू सॅमसन म्हणाला, “हे २ शतकं हुकले नाहीत. एका सामन्यात ९७ आणि एका सामन्यात ८९ धावा केल्या आहेत. ही खूप मोठी गोष्ट आहे. मी माझ्या संघाला चांगली सुरुवात करून देत आहे, याचं मला समाधान आहे. आजकल सामन्याचं खरं चित्र पावरप्लेमध्येच ठरतं. त्यामुळे ३-४ चेंडू खेळून काढल्यानंतर आक्रमण करावं लागतं. हेच अभिषेक, मी आणि इशान किशन करत आहे.”

संजू सॅमसनने या सामन्यातही सुरुवातीपासूनच हल्लाबोल केला. पण सुरुवातीलाच तो बाद होण्यापासून थोडक्यात बचावला. हॅरी ब्रुकने त्याचा सोपा झेल सोडला. जर हॅरी ब्रुकने हा झेल टिपला असता, तर संजू सॅमसन स्वस्तात बाद झाला असता. या सुटलेल्या झेलबाबत बोलताना संजू सॅमसन म्हणाला, “मी खूप लकी होतो, मला आणखी एक संधी मिळाली. त्या चेंडूवर मी मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता. पुढच्या वेळी मी आणखी जोरात फटका मारेन. कधीपासून माझं नशीब खराब होतं. पण कधीकधी नशिबाची साथ मिळते. म्हणून मी मिळालेल्या संधीचा पुरेपूर लाभ घेण्याचा प्रयत्न केला.”