वृत्तसंस्था, लंडन
जगप्रसिद्ध ‘विस्डेन’ नियतकालिकेने भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) वर्णन भारतातील सत्ताधारी भाजपची क्रीडा शाखा, असे केले असून, जागतिक क्रिकेटवर भारताचे राजकीय हस्तक्षेपाचे वर्चस्व असल्याची टीका या नियतकालिकेच्या संपादकीयात करण्यात आली आहे.

‘विस्डेन’च्या येत्या गुरुवारी प्रकाशित होणार्‍या १६३व्या वार्षिक आवृत्तीत संपादक लॉरेन्स बूथ यांनी आपली मते स्पष्टपणे मांडली आहेत. मुख्य कार्यकारी अधिकारी संजोग गुप्ता आणि अध्यक्ष जय शहा हे भारतीय सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेत (आयसीसी) असून, जय शहा भारताचे गृहमंत्री अमित शाह यांचे पुत्र आहेत, याकडे त्यांनी लक्ष वेधले आहे.

बूथ यांनी २०२५ च्या आशिया चषकादरम्यान राजकारणाने खेळात कसा शिरकाव केला, यावरही भाष्य केले आहे. भारत आणि पाकिस्तानमधील युद्धसदृश तणावाच्या पार्श्वभूमीवर हा सामना झाला, ज्यामध्ये दोन्ही देशांच्या खेळाडूंनी एकमेकांशी हस्तांदोलन करण्यास नकार दिला होता.

‘‘पाकिस्तान क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष मोहसीन नक्वी यांनी, ‘राजकारण आणि खेळ एकत्र चालू शकत नाहीत,’ असे म्हणणे, यापेक्षा खेळाच्या प्रशासनावर मोठा डाग काय असू शकतो? बहुदा ते स्वत: विसरले होते, की ते त्यांच्या देशाचे अंतर्गत सुरक्षामंत्री देखील आहेत,’’ असेही बूथ यांनी लिहिले आहे.

‘‘भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादवने पाकिस्तानविरुद्धचा आशिया चषकातील पहिला विजय भारतीय लष्कराला समर्पित केला, तेव्हा बीसीसीआय ही भाजपची क्रीडा शाखा आहे, हे उघडच झाले,’’ असेदेखील बूथ यांनी म्हटले आहे.

‘‘क्रिकेट आता घातक संघर्षांचा कायदेशीर छुपा पर्याय बनला आहे. ही कल्पना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘एक्स’वरील पोस्टने अधिक गडद केल्याचे बूथ यांचे म्हणणे आहे. अंतिम सामन्यात पाकिस्तानला हरवल्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी ‘मैदानावर ऑपरेशन सिंदूर. निकाल तोच आहे – भारताचा विजय!’’ असे म्हटले होते.