scorecardresearch

महिलांची ‘आयपीएल’ पुढील वर्षी मार्चमध्ये?

अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या महिलांच्या स्वतंत्र इंडियन प्रीमियर लीगला (आयपीएल) मार्च २०२३पासून सुरुवात होणार आहे.

महिलांची ‘आयपीएल’ पुढील वर्षी मार्चमध्ये?
महिलांची ‘आयपीएल’ मार्चमध्ये

पीटीआय, नवी दिल्ली : अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या महिलांच्या स्वतंत्र इंडियन प्रीमियर लीगला (आयपीएल) मार्च २०२३पासून सुरुवात होण्याची दाट शक्यता आहे. ही लीग एका महिन्यात पार पडणार असून, पाच संघांचा सहभाग असेल, अशी माहिती शुक्रवारी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) वरिष्ठ पदाधिकाऱ्याने दिली.

महिलांच्या लीगसाठी मार्च महिन्याला पसंती मिळत असून, ‘बीसीसीआय’च्या सप्टेंबर महिन्यात होणाऱ्या वार्षिक सर्वसाधारण सभेत यावर शिक्कामोर्तब होईल. दक्षिण आफ्रिकेत ९ ते २६ फेब्रुवारी २०२३ दरम्यान महिला ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धा होणार आहे. ही स्पर्धा संपल्यावर लगेच महिलांची ‘आयपीएल’ खेळवली जाईल, अशीही माहिती सूत्रांनी दिली.

पाच की सहा संघ?

‘‘पहिल्या वर्षी पाच संघांत लीग खेळवण्याचा विचार आहे. मात्र, अनेक जणांनी महिला लीगमध्येही गुंतवणूक करण्याची तयारी दाखवली आहे. त्यामुळे ती सहा संघांचीसुद्धा होऊ शकते. महिला संघांच्या लिलावाची माहिती योग्य वेळी जाहीर केली जाईल,’’ असेही हा पदाधिकारी म्हणाला. ‘बीसीसीआय’ अध्यक्ष सौरव गांगुली आणि सचिव जय शहा यांनी यापूर्वीच महिला ‘आयपीएल’ सुरू करण्याबाबत तयारी दर्शविली होती. महिला ‘आयपीएल’मध्ये गुंतवणूक करण्यासाठी मुंबई इंडियन्स, राजस्थान रॉयल्स, चेन्नई सुपर किंग्ज या ‘आयपीएल’ फ्रॅंचाईजींसह उद्योजक रॉनी स्क्रूवालादेखील उत्सुक असल्याचे समजते.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

ताज्या बातम्या