नवी दिल्ली : अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या महिला प्रीमियर लीगला (डब्ल्यूपीएल) मार्च महिन्याचा मुहूर्त मिळाला असून, ४ ते २६ मार्चदरम्यान ही स्पर्धा फक्त मुंबईत पार पडणार आहे. लीगमधील सामने ब्रेबॉर्न आणि डी.वाय. पाटील स्टेडियमवर पार पडतील.
स्पर्धेचा कार्यक्रम अजून निश्चित नसला तरी गुजरात जायंट्स आणि मुंबई इंडियन्स संघांदरम्यान उद्घाटनाचा सामना होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. महिला प्रीमियर लीग ४ ते २६ मार्चदरम्यान मुंबईत पार पडेल, अशी माहिती इंडियन प्रीमियर लीगचे (आयपीएल) कार्याध्यक्ष अरुण धुमल यांनी दिली. या लीगसाठी अलीकडेच संघांचा लिलाव झाला असून, यामध्ये गुजरात संघावर अदानी समूहाकडून सर्वात मोठी बोली लावली होती. आता खेळाडूंच्या लिलावाची प्रतीक्षा असून, हा लिलाव महिला ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेतील भारत-पाकिस्तान सामन्यानंतर म्हणजेच १३ फेब्रुवारीला मुंबईत होणार असल्याचेही धुमल यांनी सांगितले.
या लीगच्या पाच संघांच्या लिलावातून भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसीआय) ४६६९.९९ कोटी रुपये, तर प्रसारण हक्कातून ९५१ कोटी रुपये मिळाले आहेत. ‘आयपीएल’मधील मुंबई इंडियन्स, रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरु, दिल्ली कॅपिटल्स या संघांसह कॅप्री ग्लोबल होल्डिंग्ज आणि अदानी स्पोर्ट्सलाइन यांनी संघ खरेदी केले आहेत. या लीगसाठी १५०० खेळाडूंची नोंद झाली असून, या आठवडय़ात खेळाडूंची अंतिम यादी जाहीर केली जाईल. प्रत्येक संघाला खेळाडूंच्या खरेदीसाठी १२ कोटी रुपये खर्च करता येणार आहेत. प्रत्येक संघाला किमान १५ आणि कमाल १८ खेळाडू खरेदी करता येतील. यात प्रत्येकाला पाच परदेशी खेळाडू घेणे बंधनकारक आहे. यात एक खेळाडू सहयोगी मंडळातील असेल.
असे होतील सामने
पहिल्या लीगमध्ये एकूण २२ सामने होतील. साखळी सामन्यांनंतर अव्वल संघ थेट अंतिम फेरीसाठी पात्र ठरेल. दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावरील संघात सामना होईल आणि त्यातून अंतिम फेरीतला दुसरा संघ निश्चित होईल.