scorecardresearch

महिला आशियाई चषक फुटबॉल स्पर्धा : ‘फिफा’ विश्वचषक पात्रतेचे भारताचे स्वप्न भंगले!

घरच्या मैदानावर होणाऱ्या या स्पर्धेमार्फत २०२३च्या विश्वचषकासाठी पात्र ठरण्याची भारताला संधी होती.

महिला आशियाई चषकातील यजमानांचे सामने रद्द; ‘एएफसी’ची घोषणा

नवी दिल्ली : भारतीय संघाचे ‘एएफसी’ महिला आशियाई चषक फुटबॉल स्पर्धेमधील आव्हान सोमवारी अधिकृतरीत्या संपुष्टात आले.

 भारतीय संघातील १२ खेळाडूंना करोनाची लागण झाल्यामुळे रविवारी चायनीज तैपेईविरुद्धचा सामना होऊ शकला नाही. त्यामुळे यजमानांचे सर्व सामने रद्द धरण्यात आले असून कोणताही निकाल ग्राह्य धरला जाणार नसल्याची आशियाई फुटबॉल महासंघाने (एएफसी) सोमवारी घोषणा केली. तसेच या स्पर्धेतून बाहेर पडावे लागल्याने भारताचे २०२३च्या फिफा विश्वचषकासाठी पात्र ठरण्याचे स्वप्नही भंगले आहे. 

‘‘आशियाई चषक स्पर्धेत भारत आणि चायनीज तैपेई यांच्यातील अ-गटाचा सामना रद्द करण्यात आला. त्यामुळे ‘एएफसी’च्या नियमांतील ४.१ कलमानुसार, भारताने या संपूर्ण स्पर्धेतून माघार घेतल्याचे गृहीत धरण्यात आले आहे. भारताचे सर्व सामने आता रद्द करण्यात आले आहेत,’’ असे ‘एएफसी’च्या पत्रकात म्हटले आहे. भारताला सलामीच्या लढतीत इराणने गोलशून्य बरोबरीत रोखले होते. मात्र, साखळी फेरीअंती अंतिम गुणतालिकेत हा निकाल विचारात घेतला जाणार नाही, असेही ‘एएफसी’ने स्पष्ट केले आहे.

घरच्या मैदानावर होणाऱ्या या स्पर्धेमार्फत २०२३च्या विश्वचषकासाठी पात्र ठरण्याची भारताला संधी होती. या स्पर्धेची उपांत्य फेरी गाठणाऱ्या संघांना थेट विश्वचषकात प्रवेश मिळणार असून उपांत्यपूर्व फेरीतील संघांना विश्वचषकाच्या पात्रता फेरीत खेळण्याची संधी लाभेल. मात्र, भारतीय संघाचे आव्हान आधीच संपुष्टात आल्याने त्यांना ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये होणाऱ्या २०२३च्या विश्वचषकालाही मुकावे लागेल.

भारतीय संघातील खेळाडूंची निराशा

भारतीय संघाला महिला आशियाई चषक स्पर्धेतून अनपेक्षितरीत्या बाहेर पडावे लागल्याने सर्वच खेळाडू खूप निराश असल्याचे या संघाची गोलरक्षक आदिती चौहान म्हणाली. ‘‘आम्ही वर्षभर केवळ आशियाई चषकाचा विचार करत होतो. या स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठून विश्वचषक पात्रतेच्या दिशेने पाऊल टाकण्याचे आमचे लक्ष्य होते. मात्र, आता आम्हाला ती संधीच मिळणार नाही,’’ असेही एका भारतीय खेळाडूने सांगितले.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Women s football asia cup all india matches cancelled after covid 19 outbreak in camp zws

ताज्या बातम्या