scorecardresearch

महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धा : इंग्लंडकडून भारतीय संघाचा धुव्वा; स्पर्धेतील दुसरा पराभव

गेल्या लढतीत शतकी खेळी करणारी स्मृती मानधना (३५) सर्वाधिक धावा करणारी फलंदाज ठरली.

फलंदाजांच्या निराशाजनक कामगिरीमुळे गतविजेत्या इंग्लंडकडून बुधवारी ‘आयसीसी’ महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारताला पराभव पत्करावा लागला. सलग तीन सामने गमावलेल्या इंग्लंडने हा सामना चार गडी आणि ११२ चेंडू राखून जिंकत स्पर्धेतील पहिल्या विजयाची नोंद केली.

भारतीय संघाच्या कामगिरीत पुन्हा एकदा सातत्याचा अभाव पाहायला मिळाला. इंग्लंडने प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारताला १३४ धावांवर रोखल्यानंतर ३१.२ षटकांत हे आव्हान पूर्ण केले. या लढतीतील पराभवानंतरही भारतीय संघाने गुणतालिकेत तिसरे स्थान राखले. भारतीय संघाचे चार सामन्यांत दोन विजय आणि दोन पराभवांसह चार गुण आहेत.

गेल्या लढतीत शतकी खेळी करणारी स्मृती मानधना (३५) सर्वाधिक धावा करणारी फलंदाज ठरली. यष्टिरक्षक-फलंदाज रिचा घोषने ३३ धावांची खेळी केली. भारताने ठरावीक अंतराने बळी गमावले आणि संपूर्ण डाव ३६.२ षटकांत आटोपला. इंग्लंडकडून चार्ली डीनने २३ धावांत चार, तर आन्या श्रुबसोलने २० धावांत दोन गडी बाद केले.

१३५ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करणाऱ्या इंग्लंडने पहिल्या तीन षटकांत चार धावांवर दोन गडी गमावले. मात्र, कर्णधार हेदर नाईटने ७२ चेंडूत नाबाद ५३ धावांची खेळी करत इंग्लंडला सावरले. तिला नॅट स्किव्हरची (४५) साथ लाभल्याने इंग्लंडने विजयासह या स्पर्धेतील आव्हान कायम राखले.

संक्षिप्त धावफलक

भारत : ३६.२ षटकांत सर्व बाद १३४ (स्मृती मानधना ३५, रिचा घोष ३३; चार्ली डीन ४/२३) पराभूत वि. इंग्लंड : ३१.२ षटकांत ६ बाद १३६ (हेदर नाईट नाबाद ५३; मेघना सिंह ३/२६)

’ सामनावीर : चार्ली डीन

मितालीची आघाडीच्या फळीवर नाराजी

भारताची कर्णधार मिताली राजने आघाडीच्या फळीच्या कामगिरीवर नाराजी व्यक्त केली. ‘‘आघाडीच्या फळीतील फलंदाजांना मोठी भागीदारी करता आली नाही. आम्ही २०० हून अधिक धावा करण्याचा विचार केला होता, पण तसे झाले नाही आणि आम्ही सामना गमावला,’’ असे मिताली म्हणाली.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Women world cup cricket tournament indian team from england second defeat in the tournament akp

ताज्या बातम्या