Women’s Asia Cup 2026 Semi Finals teams schedule announced: महिला आशिया चषक २०२६ स्पर्धेतील विजेतेपदाची शर्यत आता अखेरच्या टप्प्यावर जाऊन पोहोचली आहे. गट फेरीतील सामने संपल्यानंतर, उपांत्य फेरीत भारतीय संघाचा सामना कोणाशी होणार हे आता स्पष्ट झालं आहे. आशिया चषकातील सेमीफायनलचे चार संघ आता ठरले आहेत. बांगलादेश आणि युएई यांच्यातील अखेरच्या गट टप्प्यातील सामन्यानंतर ४ संघ आणि प्रतिस्पर्धी निश्चित झाले आहेत.
गुरुवारी १० सप्टेंबरला भारत आणि बांगलादेश यांच्यात पहिला उपांत्य सामना खेळवला जाईल. भारतीय संघाने अ गटात अव्वल स्थान पटकावलं, तर बांगलादेशचा संघ ब गटात दुसऱ्या स्थानावर राहिला. दरम्यान, दुसऱ्या उपांत्य सामन्यात श्रीलंका आणि पाकिस्तान आमनेसामने येणार आहेत. यामुळे अंतिम सामन्यात पुन्हा एकदा भारत-पाकिस्तान यांच्यातील लढत होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
उपांत्य सामन्यांचा समावेश असलेली बाद फेरी (नॉकआउट स्टेज) १० सप्टेंबरपासून सुरू होत आहे. या स्पर्धेत दोन गट होते; अ गटामध्ये भारतीय संघ गुणतालिकेत अव्वल स्थानावर राहिला, तर पाकिस्तानने ४ गुणांसह दुसरं स्थान पटकावलं. दुसरीकडे, ब गटामध्ये श्रीलंकेने अव्वल स्थान मिळवलं आणि बांगलादेश दुसऱ्या स्थानावर राहिला.
Womens Asia Cup 2026 उपांत्य फेरीतील सामने कधी, कुठे होणार?
आशिया चषकाचा पहिला उपांत्य सामना भारत आणि बांगलादेश यांच्यात खेळवला जाईल. भारतीय संघ आपल्या गटात अव्वल स्थानावर राहिला असून, त्यांचा सामना ब गटामधील दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या बांगलादेश संघाशी होईल. हा सामना गुरुवार, १० सप्टेंबर रोजी दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे. या सामन्यातील विजेता संघ अंतिम फेरीत प्रवेश करेल.
दुसऱ्या उपांत्य सामन्यात श्रीलंका आणि पाकिस्तान यांच्यात लढत होईल. अ गटातील पाकिस्तानने आपल्या अखेरच्या साखळी सामन्यात हाँगकाँगचा ७२ धावांनी पराभव करून उपांत्य फेरीत धडक मारली; ४ गुणांसह त्यांनी गटात दुसरं स्थान मिळवलं. दुसरीकडे, श्रीलंका ब गटामध्ये अव्वल स्थानावर राहिली. या स्पर्धेतील दुसरा उपांत्य सामना ११ सप्टेंबर रोजी दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर होणार आहे.
आशिया चषकाच्या फायनलमध्ये भारत-पाकिस्तान भिडण्याची शक्यता
लीग टप्प्यातील लढतीनंतर, अंतिम सामन्यात भारत आणि पाकिस्तान यांच्यात पुन्हा एकदा सामना होण्याची शक्यता आहे. मात्र, हे तेव्हाच शक्य होईल जेव्हा भारतीय संघ पहिल्या उपांत्य सामन्यात बांगलादेशचा पराभव करेल आणि तसं होण्याची दाट शक्यता आहे. त्याच वेळी, पाकिस्तानला दुसऱ्या उपांत्य सामन्यात श्रीलंकेचा पराभव करावा लागेल. जर पाकिस्तानने दुसरा उपांत्य सामना जिंकला, तर अंतिम सामन्यात त्यांचा सामना भारताशी होईल.
