India vs Thailand, Women’s Asia Cup 2026: दुबईत महिलांच्या एशिया कप २०२६ स्पर्धेचा थरार सुरू आहे. भारतीय संघाचा पहिला सामना थायलंडविरुद्ध पार पडला. बलाढ्य भारतीय संघाने थायलंडवर एकतर्फी विजयाची नोंद केली. थायलंड महिला संघाने नाणेफेक जिंकून भारतीय संघाला प्रथम फलंदाजी करण्याचं आमंत्रण दिलं होतं. प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने २० षटकांअखेर ९ गडी बाद १५९ धावा केल्या. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या थायलंडला एका पाठोपाठ एक मोठे धक्के बसले. नानपनात कोंचारोकेला वगळलं तर इतर कुठलीही फलंदाज हवी तशी कामगिरी करू शकली नाही. हा सामना भारतीय संघाने ९४ धावांनी आपल्या नावावर केला आहे.
थायलंडचा दारूण पराभव…
थायलंडला हा सामना जिंकण्यासाठी १६० धावा करायच्या होत्या. पण या धावांचा पाठलाग करताना नामपनात कोंचारोकेने एकाकी झुंज दिली. तिने ४१ धावा केल्या. तर उर्वरित १० फलंदाज दुहेरी आकडा देखील गाठू शकले नाहीत. सलामीला आलेली नत्थाकन चथम अवघ्या ४ धावा करत माघारी परतली. फनिता माया ६, चनिता ५ धावा करून माघारी परतली. ४ फलंदाज तर खाते ही उघडू शकले नाहीत. थायलंडचा संपूर्ण डाव अवघ्या ६५ धावांवर आटोपला.
भारतीय संघाने केल्या १५९ धावा…
या सामन्यात प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या भारतीय संघाने २० षटकांअखेर ९ गडी बाद १५९ धावा केल्या. भारतीय संघाकडून सलामीला आलेल्या स्मृती मानधनाने १९ धावांची खेळी केली. तर शफाली वर्माने दमदार अर्धशतकी खेळी केली. शफालीने ३४ चेंडूत ८ चौकार आणि ३ षटकारांचा साहाय्याने ६४ धावांची खेळी केली. प्रतिका रावलने २२ धावा केल्या. कर्णधार हरमनप्रीत कौर अवघ्या ५ धावा करून माघारी परतली. भारती फुलमलीने १३ धावा केल्या. स्फोटक फलंदाज शून्यावर माघारी परतली. दीप्ती शर्मा ५ तर प्रेमा रावत अवघ्या ६ धावा करून माघारी परतली.
