Women’s Asia Cup 2026: India Trophy Acceptance Scenario Explained: सध्या महिला आशिया चषक २०२६ स्पर्धा खेळवली जात आहे. या स्पर्धेत भारतीय संघाने गट टप्प्यातील तिन्ही सामने जिंकत सेमीफायनलमध्ये धडक मारली आहे. महिलांची आशिया चषक स्पर्धा दुबईत खेळवली जात आहे. आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्षपद पाकिस्तानच्या मोहसीन नक्वी यांच्याकडे आहे. त्यामुळे विजेत्या संघाला आशिया चषकाची ट्रॉफी ही अध्यक्षांच्या हस्ते देण्यात येते. त्यामुळे आता भारताच्या महिला संघाने आशिया चषक २०२६ ची ट्रॉफी जिंकली तर २०२५ मधील पुरूषांच्या आशिया चषकासारखीच स्थिती ओढवणार का?
महिला टी-२० आशिया चषकामध्ये भारताने अंतिम फेरी गाठून विजेतेपद पटकावलं, तर ट्रॉफी देताना पुन्हा एकदा विचित्र परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. एसीसीचे अध्यक्ष मोहसीन नक्वी १३ सप्टेंबरला दुबईत होणाऱ्या अंतिम सामन्याच्या समारोप सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहण्याची शक्यता आहे. जिओ सुपरच्या वृत्तानुसार, विजेत्या संघाला ट्रॉफीही नक्वी यांच्या हस्ते दिली जाऊ शकते.
यामुळे मागील वर्षीच्या पुरुष आशिया चषकाच्या अंतिम सामन्यात घडलेल्या प्रकाराची पुन्हा चर्चा सुरू होण्याची शक्यता आहे. २०२५च्या अंतिम सामन्यात भारताने दुबईत पाकिस्तानचा ५ विकेट्सने पराभव करत आशिया चषकाचं विजेतेपद कायम राखलं होतं. मात्र, सामन्यानंतरच्या पारितोषिक वितरण सोहळ्यात भारतीय संघाने नक्वी यांच्या हस्ते ट्रॉफी स्वीकारली नव्हती. नक्वी हे ACC अध्यक्ष असण्याबरोबरच पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष आणि पाकिस्तानचे गृहमंत्रीही आहेत.
पुरुष आशिया चषक २०२५ च्या अंतिम सामन्यात काय घडलं होतं?
२०२५च्या अंतिम सामन्यात भारताच्या विजयानंतर ट्रॉफी वितरण सोहळा तासाभरापेक्षा अधिक काळ लांबला होता. ट्रॉफी कोणाच्या हस्ते स्वीकारायची, यामुळे विलंब झाला होता. भारतीय संघाने नक्वी यांच्या हस्ते ट्रॉफी स्वीकारण्याची इच्छा नसल्याचं स्पष्ट केलं होतं आणि त्याऐवजी एखाद्या तटस्थ अधिकाऱ्याकडून ट्रॉफी स्वीकारण्याची तयारी दर्शवली होती. मात्र, अखेर भारतीय संघाला ट्रॉफीच देण्यात आली नाही. त्यामुळे टीम इंडियाने पोडियमवर ट्रॉफीशिवायच विजेतेपदाचा जल्लोष केला होता.
या घटनेमुळे आधीपासूनच राजकीय रंग चढलेल्या या स्पर्धेत आणखी एक वादाचा मुद्दा निर्माण झाला. त्यामुळे यंदाच्या स्पर्धेत भारताने विजेतेपद पटकावल्यास अशीच परिस्थिती पुन्हा निर्माण होऊ शकते का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. मात्र, मोहसीन नक्वी यांच्या उपस्थितीत ट्रॉफी स्वीकारण्याची वेळ आल्यास भारतीय संघ किंवा BCCI नेमकी काय भूमिका घेणार, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
अपराजित भारत महिला संघाची उपांत्य फेरीत धडक
सध्या मात्र भारतीय महिला संघाचं पूर्ण लक्ष क्रिकेटवर आहे. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारताने साखळी फेरीतील तिन्ही सामने जिंकत अपराजित राहत उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. भारताने आपल्या मोहिमेची सुरुवात थायलंडविरुद्ध ९४ धावांच्या विजयाने केली. त्यानंतर हाँगकाँगविरुद्ध भारताने त्याहूनही दमदार कामगिरी केली. स्मृती मानधनाने अवघ्या ६४ चेंडूंमध्ये विक्रमी १२४ धावांची खेळी करत भारताला ५ बाद १९३ धावांपर्यंत पोहोचवलं. त्यानंतर भारतीय गोलंदाजांनी हाँगकाँगचा डाव अवघ्या ५६ धावांत गुंडाळला. भारताने हा सामना तब्बल १३७ धावांनी जिंकला, जो महिला टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील भारताचा दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा विजय ठरला.
यानंतर भारताने पाकिस्तानवर ७ विकेट्सने दणदणीत विजय मिळवला. भारतीय गोलंदाजांनी पाकिस्तानचा डाव अवघ्या ५५ धावांत गुंडाळला. श्री चरणी आणि प्रेमा रावत यांनी प्रत्येकी तीन विकेट्स घेतल्या. त्यानंतर भारताने केवळ ८.४ षटकांत लक्ष्य गाठत शानदार विजय नोंदवला. या विजयासह भारताची विजयी घोडदौड कायम राहिलीय
भारताने आता बाद फेरीत प्रवेश केल्यामुळे ट्रॉफीचा प्रश्नही पुन्हा ऐरणीवर येण्याची शक्यता आहे. १३ सप्टेंबरला हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने विजेतेपद पटकावलं, तर मोहसीन नक्वी यांच्या हस्ते टीम इंडिया ट्रॉफी स्वीकारणार का? की गेल्या वर्षीच्या पुरुष आशिया कपच्या अंतिम सामन्यातील ट्रॉफीशिवायच्या त्या अविस्मरणीय दृश्यांची पुनरावृत्ती पुन्हा पाहायला मिळणार, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.
