गतविजेत्या बांगलादेशने महिला आशिया चषक टी२० मध्ये विजयाने आपल्या मोहिमेची सुरुवात केली. दुबळ्या थायलंड महिला संघाला ८२ धावांवर बाद केल्यानंतर यजमानांनी १२ व्या षटकात १ गड्याच्या मोबदल्यात लक्ष्याचा पाठलाग केला. शमीमा सुलतानाचे अर्धशतक हुकले असले तरी तिने संघाला साजेसी अशी खेळी केली. ती ४९ धावांवर बाद झाली. या विजयासह बांगलादेशच्या महिला संघाने मोठी कामगिरी केली.

बांगलादेशचा दुसरा मोठा नऊ गडी राखून विजय

बांगलादेशच्या संघाने महिला आशिया कप टी२० प्रकारामध्ये गडी राखून चौथा सर्वोच्च विजय नोंदवला. दुसऱ्यांदा त्याने ९ गड्याने विजय मिळवला. बांगलादेश व्यतिरिक्त याआधी पाकिस्तान आणि थायलंडने १-१ वेळा ९ गडी राखून विजय मिळवला आहे. याआधी बांगलादेशनेही जून २०१८ मध्ये थायलंडचा पराभव केला होता. दुसरीकडे, पाकिस्तानने नोव्हेंबर २०१६ मध्ये बांगलादेशचा पराभव केला होता. जून २०१८ मध्ये थायलंडने मलेशियाचा पराभव केला.

तत्पूर्वी, थायलंड संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यांचे ७ फलंदाज दुहेरी आकडा देखील पार करू शकले नाहीत. फॅनिटा मायाने २६ आणि नत्थाकन चँथमने २० धावा केल्या. याशिवाय रोसेनन कानोहने ११ आणि सोर्नारिन टिपोचने १० धावा केल्या. बांगलादेशकडून रुमाना अहमदने ३ षटकांत ९ धावा देत ३ बळी घेतले. याशिवाय नाहिदा अख्तर, शांजिदा अख्तर आणि शोहले अख्तर यांनी अनुक्रमे  २-२ बळी घेतले. तर सलमा खातूनने १ बळी घेतला.

हेही वाचा :   Women’s Asia Cup 2022: जेमीमाह रोड्रिगेझची तुफानी खेळी! भारतीय महिला संघाचा श्रीलंकेवर ४१ धावांनी विजय

प्रत्युत्तर देताना बांगलादेशला यष्टिरक्षक फलंदाज शमीमा सुलताना आणि फरगाना हक यांनी चांगली सुरुवात करून दिली. ८३ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दोघींनी पहिल्या गड्यासाठी ४९ चेंडूत ६९ धावांची भागीदारी केली. सुलतानाने ३० चेंडूत १० चौकारांच्या मदतीने ४९ धावा केल्या. थिपाचा पुथावोंगने तिला  बाद केले. फरगाना २६ आणि कर्णधार निगार सुलतानाने १० धावांची नाबाद खेळी खेळली. त्याने १२व्या षटकातील चौथ्या चेंडूवर षटकार ठोकत संघाला विजय मिळवून दिला.