scorecardresearch

Women’s Asia Cup T20: आशिया चषकात महिला ब्रिगेडचा सलग तिसरा विजय, युएईचा १०४ धावांनी उडवला धुव्वा

बांगलादेश मध्ये सुरू असलेला आशिया चषक महिला क्रिकेट २०२२ मध्ये आजच्या सामन्यात भारताने युएईचा १०४ धावांनी पराभव केला.

Women’s Asia Cup T20: आशिया चषकात महिला ब्रिगेडचा सलग तिसरा विजय, युएईचा १०४ धावांनी उडवला धुव्वा
सौजन्य- ट्विटर

महिला आशिया चषकात भारतीय संघाचा तिसरा सामना मंगळवारी युएईशी झाला. या सामन्यात भारताने  नाणेफेक जिंकंत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार भारताने उत्तम सुरूवात केली. या सामन्यासाठी कर्णधार हरमनप्रीत कौर हिला आजच्या सामन्यात विश्रांती देण्यात आली. त्यामुळे संघाची धुरा मराठमोळ्या स्मृती मंधानाच्या खांद्यावर सोपवण्यात आली. भारताची सुरुवात फार खराब झाली. जेमीमाह रोड्रिगेझने ४५ चेंडूत ७५ धावा केल्याने तिला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला. या आशिया चषकातील तिचा हा दुसरा सामनावीराचा किताब आहे.

एस मेघना आणि रिचा घोष या लवकर बाद झाल्या. रिचाला तर भोपळाही फोडता आला नाही. तर मेघना १० धावा करून बाद झाली. १९ धावांवर तीन गडी बाद झाले होते. मात्र त्यानंतर आलेल्या दीप्ती शर्मा आणि जेमिमा यांच्यात १२९ धावांची भागीदारी झाली. यावेळी भारताने २० षटकात ५ गडी गमावत १७८ धावांचा डोंगर उभारला आहे. पण धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या युएईने २० षटकात ४ गड्यांच्या मोबाल्यात ७४ धावांच करू शकली.

भारतीय संघाने स्पर्धेतील सलामीचे तिन्ही सामने जिंकून विजयाची हॅटट्रिक लगावली आहे. लक्षणीय बाब म्हणजे भारत आज यूएईविरूद्धच्या सामन्यासाठी चार मोठ्या बदलांसह मैदानात उतरला होता. या सामन्यात कर्णधार हरमनप्रीतला विश्रांती देण्यात आली असल्याने तिच्या जागी स्मृती मंधाना कर्णधार म्हणून खेळली. तिने संघाचे नेतृव करताना तिला फलंदाजीची वेळच आली नाही. कारण चक्क ती सलामीला नाही आली. राजेश्वरी गायकवाड आणि हेमलताने अनुक्रमे २ व १ गडी बाद केले. युएई कडून काविषा आणि ख़ुशी शर्मा यांनाच फक्त दोन आकडी संख्या गाठता आली. त्यांनी अनुक्रमे ३० व २९ धावा केल्या.

युएई विरुद्धच्या विजयाने भारतीय संघाने गटात प्रथम क्रमांकावर आहे. आशिया चषकातील भारतीय महिला संघाचा पुढील सामना हा ७ ऑक्टोबर रोजी पाकिस्तानविरुद्ध होणार आहे. साखळी टप्प्यात सर्व सात संघ एकमेकांविरुद्ध प्रत्येकी एक सामना खेळतील आणि त्यानंतर अव्वल चार संघ उपांत्य फेरीत प्रवेश करतील.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या