पीटीआय, अ‍ॅम्सटेलव्हीन

भारतीय संघाला मंगळवारी महिला विश्वचषक हॉकी स्पर्धेतील चीनविरुद्धच्या सामन्यात १-१ अशा बरोबरीवर समाधान मानावे लागले. सलामीच्या लढतीतही   भारताची इंग्लंडशी बरोबरी झाली होती.

ब-गटातील चीनविरुद्धच्या सामन्यात भारताने पहिल्या दोन सत्रांत अधिक वेळ चेंडूवर ताबा ठेवताना गोलच्या संधीही निर्माण केल्या. मात्र, भारतीय आघाडीपटू गोल करण्यात अपयशी ठरल्या. दुसरीकडे चीनने प्रतिहल्ल्यांवर भर दिला आणि याचा फायदा त्यांना २५व्या मिनिटाला मिळाला. जियाली झेंगने गोल करत चीनला १-० अशी आघाडी मिळवून दिली. मग तिसरे सत्र संपण्यासाठी काही सेकंद शिल्लक असताना वंदना कटारियाने भारताला १-१ अशी बरोबरी साधून दिली. आता गुरुवारी भारताची अखेरची साखळी लढत न्यूझीलंडशी आहे.