वूमन्स प्रीमिअर लीग स्पर्धा शुक्रवारपासून सुरू होत आहे. यानिमित्ताने किती देशांच्या खेळाडू या स्पर्धेत सहभागी होत आहेत ते जाणून घ्या. महिला क्रिकेटमध्ये दबदबा राखणाऱ्या ऑस्ट्रेलियाच्या संघातील खेळाडू वूमन्स प्रीमिअर लीग स्पर्धेत चर्चेत असतात. यंदा अव्वल अष्टपैलू एलिसा पेरीने वैयक्तिक कारणास्तव स्पर्धेतून माघार घेतली आहे. पेरीव्यतिरिक्त ऑस्ट्रेलियाचे सगळे प्रमुख खेळाडू वूमन्स प्रीमिअर लीग स्पर्धेत खेळताना दिसणार आहेत. मेग लॅनिंग यंदा दिल्लीऐवजी उत्तर प्रदेश संघाचं नेतृत्व करणार आहे. डावखुरी फिरकीपटू ल्युसी हॅमिल्टनच्या नावाची चर्चा आहे. काही महिन्यांपूर्वी आटोपलेल्या वर्ल्डकप स्पर्धेत अंतिम लढतीत शतकी खेळी साकारणाऱ्या फोबी लिचफिल्डकडून मोठ्या अपेक्षा आहेत. अलाना किंगची फिरकी किती फलंदाजांना बुचकळ्यात टाकते हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.
भन्नाट फॉर्मात असलेलेली दक्षिण आफ्रिकेची कर्णधार लॉरा वॉल्वडार्टचा खेळ पाहणं ही चाहत्यांसाठी पर्वणी आहे. अनुभवी मारिझान कॅप छाप उमटवण्यासाठी आतूर आहे. वर्ल्डकपमध्ये उत्तम फॉर्मात असणारी नाडिन डी क्लार्क वूमन्स प्रीमिअर लीग गाजवण्यासाठी सज्ज आहे.
इंग्लंडच्या अनुभवी खेळाडू वूमन्स प्रीमिअर लीगच्या यंदाच्या हंगामाताही खेळताना दिसणार आहेत. नॅट शिव्हर ब्रंटकडून मुंबईला मोठ्या अपेक्षा आहेत. सोफी इक्लेस्टोनच्या कामगिरीकडे चाहत्यांचं लक्ष आहे. न्यूझीलंडची अमेलिआ केर अष्टपैलू कामगिरीसाठी ओळखली जाते. वेस्ट इंडिजच्या डेंट्रा डॉटिन आणि हायले मॅथ्यूज जोरदार फटकेबाजीसाठी प्रसिद्ध आहेत. यंदा त्यांच्या बॅटचा तडाखा कोणत्या संघाला बसतो हे पाहणं रंजक ठरणार आहे.
असोसिएट देशांचे खेळाडू डब्ल्यूपीएल स्पर्धेत खेळतात. गेल्या तीन हंगामांपासून या देशांचे खेळाडू वूमन्स प्रीमिअर लीग स्पर्धेत खेळत आहेत. तारा नॉरिस (अमेरिका)- दिल्ली कॅपिटल्स, कॅथरीन ब्रायस (स्कॉटलंड)- गुजरात जायंट्स आणि सारा ब्रायस (स्कॉटलंड)- दिल्ली कॅपिटल्स या तिघी आयपीएलमध्ये खेळल्या आहेत.
वूमन्स प्रीमिअर लीगच्या नियमानुसार, प्रत्येक संघाला अंतिम अकरात ४ विदेशी खेळाडू खेळवण्याची मुभा आहे. परंतु पाचवा विदेशी खेळाडू असोसिएट देशाचा असेल तर संघ ५ विदेशी खेळाडूंसह खेळू शकतो. अमेरिकेची तारा नॉरिस २०२३ मध्ये दिल्ली कॅपिटल्स संघाकडून खेळली होती. यंदाच्या हंगामात ती युपी वॉरियर्स संघाकडून खेळणार होती. मात्र तिची अमेरिकेच्या राष्ट्रीय संघात निवड झाली. टी२० वर्ल्डकप क्वालिफायर स्पर्धा नेपाळमध्ये होत आहे. त्यात सहभागी होणार असल्यामुळे ताराला युपी वॉरियर्स संघाकडून खेळता येणार नाही. तिच्याऐवजी चार्ली नॉटची संघात निवड करण्यात आली आहे. यंदा पहिल्यांदाच असोसिएट देशांचा एकही खेळाडू वूमन्स प्रीमिअर लीगमध्ये खेळताना दिसणार नाही.
देशनिहाय खेळाडूंची यादी
दक्षिण आफ्रिका (७)
चिनले हेन्री
लिझले ली
लॉरा वॉल्व्हडार्ट
मारिझान कॅप
शबनिम इस्माईल
नाडिन डी क्लार्क
चोले ट्रायॉन
ऑस्ट्रेलिया (१२)
ल्युसी हॅमिल्टन
अलाना किंग
बेथ मूनी
किम गॅरथ
मिली इलिंगवर्थ
निकोला कॅरे
जॉर्जिआ वॉल
ग्रेस हॅरिस
मेग लॅनिंग
फोबी लिचफिल्ड
चार्ली नॉट
अॅशले गार्डनर
इंग्लंड (५)
डॅनी व्हॅट हॉज
नॅट शिव्हर ब्रंट
लॉरेन बेल
लिनसे स्मिथ
सोफी इक्लेस्टोन
न्यूझीलंड (२)
सोफी डेव्हाईन
अमेलिआ केर
वेस्ट इंडिज (२)
हायले मॅथ्यूज
डेंट्रा डॉटिन
