आशिया चषकातील १५व्या सामन्यात आज भारताने यजमान बांगलादेश समोर १६० धावांचे लक्ष ठेवले आहे. यामध्ये शफाली वर्मा हिच्या अर्धशतकांचा समावेश आहे. गुणतालिकेतील स्थान टिकवण्यासाठी हा सामना भारतीय संघासाठी महत्त्वाचा आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने १५९ धावा केल्या. शफाली वर्मा आणि कर्णधार स्मृती मंधाना यांनी भारताला चांगली सुरुवात करून दिली. दोघांनी पहिल्या विकेटसाठी ७२ चेंडूत ९६ धावांची भागीदारी केली. या जोडीने पॉवरप्लेमध्येही ५९ धावा केल्या. मात्र, स्मृती ४७ धावांवर धावबाद झाली.

यानंतर भारतीय संघ रुळावरून घसरला. शफाली वर्माही ५५ धावा करून बाद झाली. तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या जेमिमाने २४ चेंडूत ३५ धावा केल्या, मात्र दुसऱ्या बाजूला ऋचा घोष चार, किरण नवगिरे शून्य आणि दीप्ती शर्मा १० धावा करून बाद झाल्या. अखेरीस, भारताने निर्धारित 20 षटकात ५गड्यांच्या मोबदल्यात १५९ धावा केल्या. हे आव्हान पार केले, तर भारताच्या पारड्यात स्पर्धेतील सलग दुसरा पराभव पडेल. तसेच, गुणतालिकेतील स्थानातही घसरण होईल.

बांगलादेशकडून यावेळी गोलंदाजी करताना रुमाना अहमद हिला सर्वाधिक बळी घेण्यात यश आले. रुमानाने ३ षटके गोलंदाजी करताना २७ धावा देत सर्वाधिक ३ गडी बाद केले. या दोघांशिवाय फहिमा खातून आणि संजीदा अख्तर यांनीही कमी धावा देत भारताला मोठी धावसंख्या उभारू दिली नाही. तिच्याव्यतिरिक्त सलमा खातून हिनेही एक गडी बाद करत संघासाठी योगदान दिले. भारतीय संघाचा हा स्पर्धेतील पाचवा सामना आहे. यापूर्वी झालेल्या चार सामन्यांपैकी ३ सामन्यात भारताने विजय मिळवला आहे, तर एका सामन्यात पाकिस्तान महिलांविरुद्ध पराभवाचा धक्का सहन करावा लागला आहे.