Women's T20 Asia Cup: Team India challenged Thailand by 149 runs in the semi-final match of the Asia Cup. avw 92 | Loksatta

Women’s T20 Asia Cup: आशिया चषकात उपांत्य फेरीतील सामन्यात टीम इंडियाने थायलंडसमोर ठेवले १४९ धावांचे आव्हान

आशिया चषकातील उपांत्य फेरीत सलामीवीर शफाली वर्माच्या आक्रमक खेळीने थायलंड समोर भारताने १४९ धावांचे लक्ष ठेवले आहे.

Women’s T20 Asia Cup: आशिया चषकात उपांत्य फेरीतील सामन्यात टीम इंडियाने थायलंडसमोर ठेवले १४९ धावांचे आव्हान
सौजन्य- बीसीसीआय (ट्विटर)

बांगलादेश येथे सुरू असलेल्या महिला आशिया चषकात आज भारत विरुद्ध थायलंड यांच्यात उपांत्य फेरीतील पहिला सामना खेळला जात आहे. आजच्याच दिवशी आशिया चषकाचा दुसरा उपांत्य फेरीतील सामना हा पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यात खेळला जाणार आहे. टीम इंडियाने महिला आशिया चषकात लक्षवेधी कामगिरी करत उपांत्य फेरी गाठली आहे. जेतेपदाचे एक प्रबळ दावेदार असणाऱ्या भारतीय महिला संघाचा थायलंडबरोबर उपांत्य फेरीतील पहिला सामना सुरु असून भारताने थायलंडसमोर विजयासाठी १४९ धावांचे लक्ष ठेवले आहे. याआधीच भारताने साखळी सामन्यात थायलंडला अवघ्या ३७ धावांत गुंडाळत मोठ्या फरकाने विजय नोंदविला होता.

उपांत्य फेरीतील या सामन्यात थायलंडने नाणेफेक जिंकत प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. भारतीय संघाची सलामीवीर शफाली वर्माने आक्रमक फटकेबाजी करत २८ चेंडूत ४२ धावांची खेळी केली. पण जोडीदार स्मृती मंधाना मात्र १३ धावा करत मोठा फटका मारण्याच्या नादात बाद झाली. त्यानंतर या मलिकेत मधल्या फळीत दोन अर्धशतक करणारी जेमीमाह रोड्रिगेझने कर्णधार हरमनप्रीतच्या साथीने मोठे फटके मारत धावगती वाढवण्याचा प्रयत्न केला. यादोघींमध्ये ४२ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी झाली. जेमीमाहने २६ चेंडूत २७ धावांची खेळी केली तर हरमनप्रीत कौरने ३० चेंडूत ३६ धावा केल्या.रिचा घोष लवकर बाद झाल्याने पूजा वस्त्रकारने १३ चेंडूत १७ धावा करत भारताला १४० धावांचा टप्पा ओलांडण्यास मदत केली.

थायलंडकडून टिपोचने भारताचे ३ गडी बाद करत ४ षटकात अवघ्या २४ धावा दिल्या. माया, पुथावोंग आणि बुचाथाम या तिघींनी प्रत्येकी १ गडी बाद करत भारताला १५० धावांच्या आत रोखले. आजच्या सामन्यातील विजयाने भारत आशिया चषकाच्या अंतिम फेरीत पोहचेल. १५ ऑक्टोबरला आशिया चषकाचा अंतिम सामना होणार आहे.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 13-10-2022 at 10:26 IST
Next Story
मुश्ताक अली क्रिकेट स्पर्धा : मुंबईचा सलग दुसरा विजय