अॅमी जोन्स आणि नताली स्किवरने केलेल्या भागीदारीच्या जोरावर, टी-२० विश्वचषकात इंग्लंडने भारतावर ८ गडी राखून मात केली आहे. अंतिम फेरीत इंग्लिश महिलांची गाठ ऑस्ट्रेलियाच्या संघाशी पडणार आहे. भारताने दिलेल्या ११३ धावांचा पाठलाग करताना इंग्लंडची सुरुवातही खराब झाली होती. सलामीच्या फलंदाज टॅमी बेमाँड आणि डॅनिअल वेट या लवकर माघारी परतल्या. मात्र यानंतर अॅमी जोन्स आणि नताली स्किवरने तिसऱ्या विकेटसाठी अभेद्य भागीदारी रचत इंग्लंडच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. इंग्लंडकडून स्किवरने ५२ तर अॅमी जोन्सने ५३ धावांची खेळी केली. भारताकडून राधा यादव आणि दिप्ती शर्माने प्रत्येकी १-१ विकेट घेतली.

त्याआधी इंग्लिश कर्णधार हेदर नाईटने केलेल्या भेदक माऱ्याच्या जोरावर महिला टी-२० विश्वचषकाच्या उपांत्य सामन्यात इंग्लंडने भारतीय महिलांना ११२  धावांवर रोखण्यात यश मिळवलं. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेल्या हरमनप्रीत कौरचा निर्णय भारतीय सलामीवीर जोडीने काही प्रमाणात सार्थ ठरवला. स्मृती मंधाना आणि तानिया भाटीया जोडीने पहिल्या विकेटसाठी ४३ धावांची भागीदारी केली. स्मृती मंधाना माघारी परतल्यानंतर, ठराविक अंतराने तानिया भाटीयाही बाद झाली.

यानंतर कर्णधार हरमनप्रीत कौरने मुंबईकर जेमिमा रॉड्रीग्जच्या साथीने भारताचा डाव सावरला. दोघांनीही तिसऱ्या विकेटसाठी छोटेखानी भागीदारी केली. मात्र रॉड्रीग्ज माघारी परतल्यानंतर भारताच्या डावाला गळती लागली. भारताच्या मधल्या फळीतल्या सर्व फलंदाज एकामागोमाग एक विकेट फेकत राहिल्या. दुसऱ्या बाजूने कर्णधार हरमनप्रीत कौरने फटकेबाजी करत भारताच्या डावाला आकार देण्याचा प्रयत्न केला. मात्र लागोपाठ विकेट जाण्याचं सत्र सुरु राहिल्यामुळे तीदेखील मोठा फटका खेळण्याच्या नादात माघारी परतली. भारताकडून स्मृती मंधाना, जेमिमा रॉड्रीग्ज, तानिया भाटीया आणि कर्णधार हरमनप्रीत कौर या ४ फलंदाजांनाच दोन आकडी धावसंख्या गाठता आली. इतर सर्व फलंदाजांनी निराशा केली.

इंग्लंडकडून कर्णधार हेदर नाईटने ३ तर सोफी एस्कलटोन आणि ख्रिस्ती गॉर्डन यांनी प्रत्येकी २-२ विकेट घेतल्या. उपांत्य फेरीत मिताली राजला संघातून वगळणं भारताला चांगलचं महागात पडल्याचं सिद्ध झालं आहे. अंतिम फेरीत इंग्लंडची गाठ ऑस्ट्रेलियाशी पडणार आहे.

Live Blog

08:08 (IST)23 Nov 2018
इंग्लंड सामन्यात विजयी, अंतिम फेरीत प्रवेश

अॅमी जोन्स आणि नताली स्किवरने केलेल्या अर्धशतकी खेळाच्या जोरावर इंग्लंडने भारतीय महिलांवर ८ गडी राखून मात केली. अंतिम फेरीत इंग्लंडसमोर ऑस्ट्रेलियाचं आव्हान.

08:00 (IST)23 Nov 2018
अॅमी जोन्स - नताली स्विकरची अभेद्य भागीदारी, इंग्लंडची विजयाच्या दिशेने वाटचाल

अॅमी आणि नताली स्किवरने पहिल्या दोन विकेट गेल्यानंतर तिसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी रचत इंग्लंडच्या विजयाचा पाया रचला.

07:23 (IST)23 Nov 2018
इंग्लंडला दुसरा धक्का,डॅनिअल वेट माघारी

दिप्ती शर्माच्या गोलंदाजीवर मोठा फटका खेळण्याच्या नादात डॅनिअल वेट बाद. सीमारेषेवर जेमिमा रॉड्रीग्जने पकडला झेल

07:12 (IST)23 Nov 2018
इंग्लंडचीही खराब सुरुवात, टॅमी बेमाँड माघारी

फिरकीपटू राधा यादवने आपल्या पहिल्याच षटकात टॅमी बेमाँडचा अडसर दूर केला. अरुंधती रेड्डीने पकडला झेल

06:56 (IST)23 Nov 2018
भारताची अखेरची फलंदाज धावबाद होऊन माघारी, इंग्लिश महिलांना विजयासाठी ११३ धावांचं आव्हान

दिप्ती शर्मा धावबाद. भारताची ११२ धावांपर्यंत मजल

06:54 (IST)23 Nov 2018
भारताला नववा धक्का, अरुंधती रेड्डी यष्टीचीत होऊन माघारी

सोफी एस्कलटोनला सामन्यात दुसरं यश

06:45 (IST)23 Nov 2018
भारताला आठवा धक्का, राधा यादव माघारी

१९ व्या षटकात चोरटी धाव घेताना राधा यादव डॅनी वेटच्या थेट फेकीवर धावबाद

06:40 (IST)23 Nov 2018
अखेर भारताने ओलांडला १०० धावसंख्येचा टप्पा

१८ व्या षटकात भारतीय महिलांनी ओलांडला १०० धावसंख्येचा टप्पा

06:40 (IST)23 Nov 2018
एकाच षटकात हेदर नाईटचे भारताला दोन दणके

हेदर नाईटने एकाच षटकात हेमलता आणि अनुजा पाटील यांना बाद करत भारताला बॅकफूटवर ढकललं

06:32 (IST)23 Nov 2018
गॉर्डनचा भारताला आणखी एक धक्का, कर्णधार हरमनप्रीत कौर माघारी

एकामागोमाग एक विकेट पडत असताना हरमनप्रीत कौर फटकेबाजी करण्याच्या नादात माघारी, भारताला पाचवा धक्का

06:31 (IST)23 Nov 2018
भारताला चौथा धक्का, वेदा कृष्णमुर्ती स्वस्तात माघारी

ख्रिस्ती गॉर्डनच्या गोलंदाजीवर वेदा यष्टीरक्षक जोन्सकडे झेल देऊन माघारी

06:23 (IST)23 Nov 2018
भारताला तिसरा धक्का, जेमिमा रॉड्रीग्ज धावबाद

कर्णधार हरमनप्रीत कौर आणि जेमिमा रॉड्रीग्ज यांच्यात तिसऱ्या विकेटसाठी छोटेखानी भागीदारी. मात्र चोरटी धाव घेताना जेमिमा धावबाद. भारताला तिसरा धक्का

06:04 (IST)23 Nov 2018
भारताला दुसरा धक्का, तानिया भाटीया माघारी परतली

हेदर नाईटच्या गोलंदाजीवर मोठा फटका खेळण्याच्या नादात तानिया भाटीया बाज. दरम्यान भारताने ओलांडला ५० धावसंख्येचा टप्पा

06:01 (IST)23 Nov 2018
भारतीय महिलांना पहिला धक्का, स्मृती मंधाना माघारी

सोफी एस्कलटोनच्या गोलंदाजीवर एक फटका खेळताना स्मृती झेलबाद

05:59 (IST)23 Nov 2018
स्मृती मंधाना - तानिया भाटीया जोडीची सावध सुरुवात

अँटीग्वाच्या खेळपट्टीवर चेंडू हवेत वळत असल्यामुळे भारतीय महिला फलंदाजांना सुरुवातीला फटके खेळण्यास समस्या आली. यादरम्यान आपल्याला मिळालेल्या एका जीवदानाचा फायदा घेत स्मृती मंधाना - तानिया भाटीया जोडीने भारताला सावध सुरुवात करुन दिली आहे. 

दोघांमध्ये पहिल्या विकेटसाठी ४३ धावांची भागीदारी

05:57 (IST)23 Nov 2018
हरमनप्रीत कौरने नाणेफेक जिंकली, प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय

उपांत्य सामन्यात भारतीय संघाने अनुभवी मिताली राजला संघात स्थान दिलेलं नाहीये.