Harmapreet Kaur Statement: भारत आणि बांगलादेश या दोन्ही संघांमध्ये महिला टी-२० वर्ल्डकप २०२६ स्पर्धेतील २३ वा सामना पार पडला. हा सामना भारतीय संघासाठी सेमीफायनलच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी अतिशय महत्वाचा होता. ओल्ड ट्रॅफर्डच्या मैदानावर पार पडलेल्या या सामन्यात बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना बांगलादेशने २० षटकांअखेर १३६ धावा केल्या. भारतीय संघाने हे आव्हान सहज पूर्ण केलं. पण क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा चर्चेत राहिलं. गेल्या सामन्याप्रमाणे या सामन्यातही भारतीय खेळाडूंनी सोपे झेल सोडले. दरम्यान सामना झाल्यानंतर कर्णधार हरमनप्रीत कौरने याबाबत मोठं वक्तव्य केलं आहे.

या सामन्यात भारतीय संघाला विजयासाठी १३७ धावा करायच्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना शफाली वर्माने दमदार अर्धशतकी खेळी केली. शफालीने ५३ धावा केल्या. तर जेमिमा रॉड्रिग्जने शेवटी हरमनप्रीत कौरसोबत मिळून महत्वपूर्ण भागीदारी केली. यादरम्यान तिने २६ धावा केल्या. बांगलादेशने दिलेलं आव्हान भारतीय संघाने १९ चेंडू शिल्लक ठेवून पूर्ण केलं.

दरम्यान सामन्यानंतर बोलताना कर्णधार हरमनप्रीत कौर म्हणाली, “आम्ही अशाच विजयाच्या शोधात होतो. आम्ही सामना आणखी लवकर संपवण्याचा विचार केला होता. पण दुर्देवाने तसं झालं नाही. तरीही, सामना ज्यावेळी संपला त्यावेळी २-३ षटकं शिल्लक होती. मला वाटतं, हा आमच्यासाठी प्लस पॉईंट आहे.”

भारतीय संघात एकापेक्षा एक स्टार क्षेत्ररक्षक आहेत. पण या स्टार खेळाडूंकडून वारंवार सोपे झेल सुटत आहेत. याबाबत बोलताना हरमनप्रीत कौर म्हणाली, “हो, ते खरं आहे. आमच्या संघात सर्वोत्तम क्षेत्ररक्षक आहे. पण कधीकधी परिस्थिती अशी निर्माण होते, त्यावर नियंत्रण नसतं. आम्ही मैदानात येण्याआधी याच गोष्टींवर चर्चा केली की, आपण मेहनत घेत राहू, मैदानावर जास्तीत जास्त वेळ घालवूया आणि झेल घेण्याचा सराव करत राहूया. जेणेकरुन जेव्हा मैदानात उतरु,तेव्हा आत्मविश्वास वाढलेला असेल. पण दुर्देवाने, आज पुन्हा एकदा आमच्याकडून अनेक चुका झाल्या. पण मला खात्री आहे की, पुढचा सामना आमच्यासाठी अतिशय महत्वाचा सामना आहे. या सामन्यात आम्ही आमची सर्वोत्तम कामगिरी करु.”