India-w vs Bangladesh-w: आयसीसी महिला टी-२० वर्ल्डकप २०२६ स्पर्धेतील २३ वा सामना भारत आणि बांगलादेश या दोन्ही संघांमध्ये पार पडला. ओल्ड ट्रॅफर्डच्या मैदानावर पार पडलेल्या या सामन्यात बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना बांगलादेशने ८ गडी बाद १३६ धावा केल्या. या धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाकडून शेफाली वर्माने ५३ धावांची दमदार अर्धशतकी खेळी केली. शेवटी जेमिमा रॉड्रिग्ज आणि कर्णधार हरमनप्रीत कौरने मिळून भारतीय संघाला विजय मिळवून दिला. पण हा विजय भारतीय संघाला वर्ल्डकप जिंकून देण्यासाठी पुरेसा नाही.

भारतीय संघ हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वोत्तम क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघांपैकी एक आहे. पण या स्पर्धेत क्षेत्ररक्षणात भारतीय संघाचा सुपरफ्लॉप शो पाहायला मिळाला आहे. दक्षिण आफ्रिकेविरूद्ध झालेल्या सामन्यात भारतीय संघाने सोपे झेल सोडले होते. निर्णायक क्षणी राधा यादवने मॅरीझॅन कॅपचा झेल सोडला, खऱ्या अर्थाने सामनाही तिथेच सोडला. भारतीय खेळाडू चुका सावरुन मैदानात उतरणार असं वाटत असताना, बांगलादेशविरूद्धच्या सामन्यात भारतीय खेळाडूंनी हद्दच पार केली. पावरप्लेमध्येच भारतीय खेळाडूंनी ५ सोपे झेल सोडले. यापैकी ३ झेल तर लागोपाठ सोडले. बांगलादेशचा संघ होता, म्हणून याचा फार काही फटका बसला नाही. पण अशाच चुका जर बलाढ्य संघांविरूद्ध खेळताना होत राहिल्या, तर भारतीय संघाला हे चांगलंच महागात पडेल.भारतीय संघाला जर वर्ल्ड चॅम्पियन बनायचं असेल, तर भारतीय संघाला झेल सोडण्याचं प्रमाण कमी करावं लागेल.

भारतीय संघाला हा सामना जिंकण्यासाठी १३७ धावा करायच्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना स्मृती मानधना आणि शेफाली वर्माची जोडी मैदानावर आली. या जोडीकडून चांगल्या सुरुवातीची अपेक्षा होती. पण स्मृती मानधना अवघ्या ८ धावा करुन माघारी परतली. त्यानंतर शेफाली वर्मा आणि यस्तिका भाटीयाने मिळून भारतीय संघाचा डाव सावरला. यस्तिकाने २३ धावांचे योगदान दिले. तर शेफाली वर्माने ३४ चेंडूंचा सामना करत ५३ धावांची दमदार खेळी केली. ऋचा घोषने १२ चेंडूंमध्ये १० धावा केल्या. तर जेमिमा रॉड्रिग्जने शेवटी १४ चेंडूंमध्ये २६ धावांची खेळी करून भारतीय संघाला विजयाच्या जवळ पोहोचवलं. भारतीय संघाने हा सामना ५ गडी राखून आपल्या नावावर केला.

या सामन्यातील सकारात्मक बाब म्हणजे, टॉप ऑर्डरचे फलंदाज फ्लॉप ठरल्यानंतर जेमिमा रॉड्रिग्जने मधल्या फळीत मोलाचं योगदान दिलं. याआधी महिला वर्ल्डकप २०२५ स्पर्धेतही भारतीय संघाला गरज असताना तिने शतकी खेळी करुन भारतीय संघाला विजय मिळवून दिला होता. आता बांगलादेशविरूद्धच्या सामन्यात तिने १५ चेंडूत २७ धावांची खेळी केली. ही खेळी मोठी नसली, तरी परिस्थितीनुसार भारतीय संघासाठी अतिशय महत्वाची होती. कारण विकेट्स गेल्यानंतर, जेमिमा रॉड्रिग्जही स्वस्तात बाद झाली असती, तर भारताचा डाव पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे कोसळला असता.

बांगलादेशने दिलं १३७ धावांचं आव्हान

या सामन्यात बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पण हा निर्णय पूर्णपणे फसला. बांगलादेशला सुरुवातीलाच मोठा धक्का बसला. दिलारा अक्टेर अवघ्या ४ धावांवर माघारी परतली. जूआरिया फर्दोसने बांगलादेशकडून सर्वाधिक ३३ धावांची खेळी केली. तर सोबानाने २२ धावांचे योगदान दिले. कर्णधार निगर सुल्तााने ३२ धावांची खेळी केली. या खेळीच्या बळावर बांगलादेशने २० षटकांअखेर ८ गडी बाद १३६ धावा केल्या.