महिला विश्वचषक स्पर्धेत साखळी फेरीतील शेवटच्या टप्प्यात घडामोडी वेगाने घडत आहे. उपांत्य फेरीत कोण स्थान निश्चित करणार याबाबत क्रीडाप्रेमींमध्ये चर्चा रंगली आहे. प्रत्येक संघ साखळी फेरीत प्रत्येकी सात सामने खेळणार आहे. आतापर्यंत प्रत्येक संघ ६ सामने खेळला आहे. तर वेस्ट इंडिज ७ आणि बांगलादेश ५ सामने खेळला आहे. त्यामुळे आता उपांत्य फेरीतील संघ निश्चित होत आहे. साखळी फेरीतील सहा पैकी सहा सामने जिंकत ऑस्ट्रेलियाने उपांत्य फेरीत स्थान पक्कं केलं आहे. तर दक्षिण अफ्रिका आणि वेस्ट इंडिज यांच्यातील सामना पावसाच्या व्यत्ययामुळे स्थगित झाल्याने गणितं बदलली आहेत. दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण देण्यात आला आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियानंतर उपांत्य फेरीत स्थान मिळवणारा दक्षिण अफ्रिका दुसरा संघ ठरला आहे. त्यामुळे उर्वरित दोन संघासाठी भारत, इंग्लंड आणि वेस्ट इंडिजमध्ये चुरस निर्माण झाली आहे. तर पाकिस्तान, बांगलादेश संघ स्पर्धेबाहेर गेला आहे. यजमान न्यूझीलंड संघही स्पर्धेबाहेर गेला आहे, मात्र एका गणितावर आशा जिवंत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भारत- भारताने साखळी फेरीत एकूण सहा सामने खेळले असून ३ सामन्यात विजय तर ३ सामन्यात पराभवाचं तोंड पाहावं लागलं आहे. त्यामुळे उपांत्य फेरीत जाण्यासाठी शेवटचा सामना जिंकावाच लागणार आहे. भारताचे तीन विजयांसह गुणतालिकेत ६ गुण झाले आहेत. त्यामुळे २७ मार्चला दक्षिण अफ्रिकेविरुद्ध साखळी फेरीतील शेवटच्या सामन्यात विजय मिळवणं आवश्यक आहे. या विजयानंतर भारताचे ८ गुण होतील आणि भारताचं उपांत्य फेरीतील स्थान निश्चित होईल.

इंग्लंड- इंग्लंड संघाने भारतासारखेच साखळी फेरीत ३ सामने गमावले असून ३ सामन्यात विजय मिळवला आहे. इंग्लंडचे गुणतालिकेत सहा गुण झाले आहेत. त्यामुळे उपांत्य फेरीत स्थान मिळवण्यासाठी २७ मार्चला बांगलादेश विरुद्ध होणारा सामना जिंकावा लागेल. या विजयानंतर इंग्लंडचे ८ गुण होतील आणि इंग्लंडचं उपांत्य फेरीतील स्थान निश्चित होईल.

Video: भर मैदानात डेव्हिड वॉर्नर आणि शाहीन आफ्रिदी यांच्यात ठसन! पण…

वेस्ट इंडिज- वेस्ट इंडिजचे साखळी फेरीतील सातही सामने खेळून झाले आहेत. त्यामुळे आता या संघाचं भारत आणि इंग्लंड या दोन संघांच्या कामगिरीकडे लक्ष लागून आहे. दक्षिण अफ्रिकेविरुद्धचा सामना अनिर्णित ठरल्याने एका गुणाच्या कमाईसह ७ गुण झाले आहेत. त्यामुळे इंग्लंड किंवा भारत शेवटच्या साखळी फेरीतील सामन्यात पराभूत झाला तर वेस्ट इंडिजचं उपांत्य फेरीतील स्थान पक्कं होणार आहे.

भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांनी शेवटचा सामना गमवला आणि न्यूझीलंडने पाकिस्तान विरुद्धचा सामना जिंकला, तर वेस्ट इंडिजचं स्थान पक्कं होईलच. पण चौथ्या संघासाठी भारत, इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात चुरस असेल. या तीन संघापैकी एका संघाची रनरेटच्या आधारावर उपांत्य फेरीसाठी निवड होईल. पण सध्याचा रनरेट पाहता न्यूझीलंडला पुढचा विजय मोठ्या फरकाने मिळवावा लागेल.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Womens world cup 2022 how will india enter in semi final know equations rmt
First published on: 24-03-2022 at 12:01 IST