पीटीआय
कामगिरीत सातत्याचा अभाव असलेल्या भारतीय संघापुढे महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत मंगळवारी बांगलादेशचे आव्हान असेल. उपांत्य फेरीतील प्रवेशाच्या आशा कायम राखण्यासाठी भारताला या सामन्यात विजय अनिवार्य आहे. मिताली राजच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाला यंदा विश्वचषक जिंकण्यासाठी प्रबळ दावेदार मानले जात होते. मात्र त्यांना आतापर्यंतच्या सामन्यात अपेक्षित कामगिरी करता आलेली नाही. भारताने दोन सामने जिंकले असून तीन सामन्यांत त्यांना पराभव पत्करावा लागला आहे. त्यांना मागील दोन सामन्यांत अनुक्रमे इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया या संघांनी पराभूत केले. त्यामुळे आता भारतीय संघाला आगेकूच करण्यासाठी आपला खेळ उंचावावा लागणार आहे.




विश्वचषकाला सुरुवात होण्याआधीपासूनच भारताला फलंदाजांच्या कामगिरीची चिंता सतावत होती. त्यातच गेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने २७८ धावांचे लक्ष्य सहजरीत्या पार केल्याने आता गोलंदाजीबाबतही प्रश्न उपस्थित झाले आहेत. ऑस्ट्रेलियाने या सामन्यात पहिल्या षटकापासूनच आक्रमक शैलीत फलंदाजी करत भारतीय गोलंदाजांवर दडपण टाकले. भारतीय गोलंदाजांनी हे दडपण हाताळत सामन्यात पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला, पण त्यात त्या अपयशी ठरल्या.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यासाठी भारताने अष्टपैलू दीप्ती शर्माला वगळून सलामीवीर शफाली वर्माच्या रूपात एक अतिरिक्त फलंदाज खेळवण्याचा निर्णय घेतला. मात्र ऑफ-स्पिनर दीप्तीच्या गोलंदाजीची कमी भारताला जाणवली. त्यामुळे बांगलादेशविरुद्ध तिचे संघात पुनरागमन होऊ शकेल. तसे झाल्यास शफालीला पुन्हा संघाबाहेर बसावे लागेल आणि अनुभवी स्मृती मानधानाच्या साथीने युवा यास्तिका भाटिया सलामीला येईल.
स्मृतीसह कर्णधार मिताली आणि उपकर्णधार हरमनप्रीत कौर यांच्यावर भारतीय फलंदाजीची भिस्त आहे. आतापर्यंतच्या पाच सामन्यांत स्मृतीने एक शतक आणि एक अर्धशतक, तर हरमनप्रीतने एक शतक आणि दोन अर्धशतके झळकावली आहेत. मितालीने ऑस्ट्रेलियाविरुद्ध अर्धशतकी खेळी केली. त्यामुळे बांगलादेशविरुद्ध भारताला मोठी धावसंख्या उभारायची असल्यास या अनुभवी त्रिकुटाने खेळपट्टीवर अधिकाधिक वेळ घालवणे गरजेचे आहे. अष्टपैलू पूजा वस्त्रकार चमकदार कामगिरी करत असून गोलंदाजीत अनुभवी झुलन गोस्वामी, मेघना सिंग, स्नेह राणा आणि राजेश्वरी गायकवाड यांचे सातत्यपूर्ण कामगिरीचे ध्येय असेल.
भारत गुणतालिकेत चौथ्या स्थानी
पाचपैकी दोन सामने जिंकणारा भारतीय संघ महिला विश्वचषकाच्या गुणतालिकेत चार गुणांसह चौथ्या स्थानावर आहे. साखळी फेरीअंती अव्वल चार संघ उपांत्य फेरीत प्रवेश करणार आहेत. त्यामुळे भारताने बांगलादेश (२२ मार्च) आणि दक्षिण आफ्रिका (२७ मार्च) यांच्याविरुद्धचे पुढील दोन्ही सामने जिंकणे महत्त्वाचे आहे. बांगलादेशने आतापर्यंत केवळ एक सामना जिंकल्याने या सामन्यात भारताचे पारडे जड मानले जात आहे.
सामना जिंकणे सर्वात महत्त्वाचे – राणा
भारतीय संघाचा महिला विश्वचषकातील उर्वरित दोन्ही साखळी सामने जिंकण्यावर भर असेल. आम्ही निव्वळ धावगतीचा फारसा विचार करणार नाही, अशी प्रतिक्रिया भारताची अष्टपैलू स्नेह राणाने व्यक्त केली. ‘‘आम्ही गेले दोन्ही सामने गमावले असले, तरी बांगलादेशविरुद्धच्या सामन्यापूर्वी संघातील वातावरण सकारात्मक आहे. आमच्यासाठी पुढील दोन्ही सामने जिंकणे सर्वात महत्त्वाचे आहे. बांगलादेशने याआधीच्या सामन्यांमध्ये चांगली कामगिरी केली आहे. त्यांच्या खेळात सामन्यागणिक सुधारणा होत आहे. त्यामुळे त्यांना कमी लेखण्याची चूक आम्ही करणार नाही,’’ असे राणा म्हणाली.
- वेळ : सकाळी ६.३० वा. ’ थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स २, ३