महिला विश्वचषक २०२२ मध्ये उपांत्य फेरीची लढत रंगतदार वळणावर आली आहे. या स्पर्धेत ऑस्ट्रेलियाने पहिले पाच सामने जिंकून उपांत्य फेरी गाठली आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर असलेला दक्षिण अफ्रिकेला उपांत्य फेरीत जाण्यासाठी एका विजयाची प्रतीक्षा आहे. दुसरीकडे, पाकिस्तानने वेस्ट इंडिजविरुद्ध स्पर्धेतील पहिला विजय नोंदवून खळबळ उडवून दिली. वेस्ट इंडिजचा संघ गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर आहे. सहा सामन्यांपैकी तीन सामन्यात पराभूत झाला आहे आणि तीन जिंकले आहेत. कॅरेबियन संघाचा आता शेवटचा साखळी सामना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आहे. तर विजयामुळे आत्मविश्वास दुणावलेल्या पाकिस्तानला इंग्लंड आणि न्यूझीलंडचा सामना करायचा आहे. तर उद्या भारताचा सामना बांगलादेशसोबत होणार आहे.
उपांत्य फेरीचं गणित कसं असेल?
उपांत्य फेरी गाठण्याच्या समीकरणाबद्दल बोलायचं झालं तर एक संघ निश्चित आहे. म्हणजेच ऑस्ट्रेलिया सोडून उर्वरित सातही संघ जोरदार प्रयत्न करत आहेत. जर पाकिस्तानने आपले उर्वरित दोन्ही सामने म्हणजेच इंग्लंड आणि न्यूझीलंडला चांगल्या फरकाने हरवलं. दुसरीकडे, भारताने बांगलादेश आणि दक्षिण आफ्रिकेला त्यांच्या दोन्ही सामन्यांमध्ये पराभूत केल्यास उपांत्य गाठण्याच्या भारताच्या आशा कायम राहतील. जरी भारत दक्षिण आफ्रिकेकडून हरला आणि पाकिस्तानने दोन्ही सामने जिंकले तर चांगल्या नेट रनरेटमुळे भारत पुढे असेल आणि उपांत्य फेरी गाठू शकेल. दुसरीकडे दक्षिण आफ्रिकेला ऑस्ट्रेलिया, वेस्ट इंडिज आणि भारताचा सामना करावा लागणार आहे. दक्षिण अफ्रिकेने संघाने एक सामना जिंकल्यास उपांत्य फेरीत पोहोचेल. तर बांगलादेशचा रस्ता खूप अवघड आहे. मात्र, त्यांनी आतापर्यंत चार सामने खेळले असून एक जिंकला आहे. आगामी सामने भारत, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्याविरुद्ध होणार आहेत.
यजमान न्यूझीलंडचा उपांत्य फेरीचा रस्ताही अवघड आहे. न्यूझीलंडला फक्त पाकिस्तानविरुद्ध आणखी एक सामना खेळायचा आहे. हा सामना जिंकला तर ६ गुण होतील. पण उपांत्य फेरीत जाण्यासाठी यजमानांना मोठा विजय नोंदवावा लागेल. दुसरीकडे, इंग्लंडचे दोन सामने पाकिस्तान आणि बांगलादेश सोबत आहे. त्यांना दोन्ही सामने जिंकून उपांत्य फेरीतील तिसरा संघ बनण्याची संधी आहे.तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या वेस्ट इंडिजचा नेट रन रेट खूपच खराब आहे. जर त्यांनी शेवटचा सामना दक्षिण आफ्रिकेकडून गमावला तर त्यांच्या उपांत्य फेरीत जाण्याच्या आशा धुसर होतील. मात्र कॅरेबियन संघाने हा सामना जिंकला तर भारत आणि इंग्लंडसाठी पुन्हा अडचणी निर्माण होऊ शकतात. मिताली ब्रिगेडने या स्पर्धेत आतापर्यंत पाच सामने खेळले आहेत, त्यापैकी दोन जिंकले आहेत आणि तीन सामन्यात पराभवाचं तोंड पाहावं लागलं आहे. पण भारताचा नेट रन रेट गुणतालिकेत ऑस्ट्रेलियानंतर सर्वोत्तम आहे.
भारतीय संघाची कामगिरी
भारत विरुद्ध पाकिस्तान | भारत २४४/७, पाकिस्तान १३७ | भारताचा १०७ धावांनी विजय |
भारत विरुद्ध न्यूझीलंड | न्यूझीलंड २६०/९, भारत १९८ | भारताचा ६२ धावांनी पराभव |
भारत विरुद्ध वेस्ट इंडिज | भारत ३१७/८, वेस्ट इंडिज १६२ | भारताचा १५५ धावांनी विजय |
भारत विरुद्ध इंग्लंड | भारत १३४, इंग्लंड १३६/६ | भारताचा ४ गडी राखून पराभव |
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया | भारत २७७/७, ऑस्ट्रेलिया २८०/४ | भारताचा ६ गडी आणि ३ चेंडू राखून पराभव |