जागतिक हॉकी लीग उपांत्य फेरी स्पध्रेत भारताच्या बचावफळीची परीक्षा पाहणारी लढत शुक्रवारी होणार आहे. उपांत्य फेरीत भारतासमोर यजमान बेल्जियमचे आव्हान असून त्यांच्याविरुद्ध आक्रमक पवित्रा आजमावण्याचा निर्धार भारताने केला आहे. बेल्जियमला घरच्या प्रेक्षकांचा पाठींबा असल्याने त्यांचे पारडे जड मानले जात आहे. असे असले तरी भारताची कामगिरी पाहता त्यांना रोखणे यजमानांसाठी तितके सोपे नाही.
रिओ ऑलिम्पिकसाठी आधीच पात्र ठरलेल्या भारतासाठी ही स्पर्धा म्हणजे आपली तयारी चाचपडून पाहण्याची संधी होती. त्यादृष्टीने प्रशिक्षक पॉल व्हॅन अ‍ॅस यांनी विविध प्रयोग करून युवा खेळाडूंना संधी दिली. त्यात ते यशस्वीही झाले. मात्र, बेल्जियम विरुद्ध इतिहास पाहता भारताला निश्चितपणे फार मेहनत घ्यावी लागणार आहे.
‘‘बेल्जियमची व्यूहरचना आमच्या खेळाला अनुरूप आहे. त्यांच्या डावपेचांसाठी आम्ही सज्ज आहोत,’’ असे मत प्रशिक्षक अ‍ॅस यांनी मांडले. भारताला आशियाई देशांकडूनच कडवे आव्हान मिळते, अशी कबुलीही अ‍ॅस यांनी दिली. याची प्रचिती मलेशियाविरुद्धच्या लढतीत मिळाली. अटीतटीच्या लढतीत भारताने ३-२ अशी बाजी मारली होती.
सामन्याची वेळ : संध्याकाळी ६.३० वा. पासून
थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स-१, स्टार स्पोर्ट्स-१ एचडी