भारताची अव्वल तिरंदाज दीपिका कुमारीचे बेलेक, तुर्की येथे सुरू असलेल्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतले आव्हान संपुष्टात आले. दीपिकासह स्पर्धेतील अन्य भारतीय तिरंदाजपटूंचे आव्हानही संपुष्टात आले आहे. कंपाऊंड प्रकारात पुरुषांमध्ये रजत चौहानचा अपवाद वगळता कोणत्याही भारतीय तिरंदाजाला अंतिम १६ मध्ये धडक मारता आली नाही. दरम्यान सांघिक प्रकारात भारतीय तिरंदाजांना आपले कौशल्य सिद्ध करण्याची संधी आहे. महिलांच्या एकेरी रिकव्‍‌र्ह प्रकारात लंडन ऑलिम्पिक कांस्यपदक विजेत्या मेक्सिकोच्या मारिआना अव्हितियाने दीपिकावर ६-२ अशी मात केली. गेल्या महिन्यात तिरंदाजी विश्वचषकात रौप्यपदकाची कमाई करणाऱ्या दीपिकाने मारिआना विरुद्धच्या लढतीत दुसऱ्या आणि चौथ्या सेटमध्ये पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला मात्र तो अयशस्वी ठरला. कोरियाच्या बो बाअ किने अनुभवी डोला बॅनर्जीचा ६-० असा धुव्वा उडवला. पुरुषांमध्ये वैयक्तिक रिकव्‍‌र्ह प्रकारात कोरियाच्या जिन हायेक ओहने तरुणदीप रायवर ६-० अशी मात केली. पात्रता फेरीतून मुख्य फेरीत दाखल झालेल्या झिओझिआंग दाईने कपिलचा ६-० असा पराभव केला. जयंत तालुकदारला पहिल्या फेरीचा अडथळाही पार करता आला नाही.