युजीन (अमेरिका)

भारताच्या अविनाश साबळेला जागतिक अ‍ॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेच्या चौथ्या दिवशी ३००० मीटर स्टीपलचेस स्पर्धा प्रकारात निराशाजनक कामगिरीसह ११व्या स्थानी समाधान मानावे लागले.

२७ वर्षीय साबळेने ८:३१.७५ सेकंद वेळ नोंदवली. जी त्याच्या (८:१२.४८ से.) राष्ट्रीय विक्रमाच्या जवळपासही नव्हती. यावेळची ३००० मीटर स्टीपलचेस स्पर्धा ही सर्वात धिमी म्हणावी लागेल. कारण तिन्ही पदक विजेत्यांची हंगामातील किंवा सर्वोत्तम कामगिरी यात आणि जागतिक स्पर्धेच्या कामगिरीत कमालीची तफावत होती. मोरोक्कोच्या ऑलिम्पिक विजेत्या सॉफियाने एल बक्कालीने (७:५८.२८ से.) हंगामातील सर्वोत्तम वेळेची नोंद केली होती, त्याने ८:२५.१३ सेकंद वेळेसह सुवर्णपदक जिंकले. तर टोक्यो ऑलिम्पिक रौप्यपदक विजेता लामेचा गिरमाने ८:२६.०१ सेकंद वेळेची नोंद करत रौप्यपदक पटकावले. केनियाचा गतविजेता कॉन्सेस्लस किपुर्तो ८:२७.९२ से. वेळेसह तिसरा आला.

साबळे ८:१८.३७ सेकंद वेळेसह तिसऱ्या शर्यतीमध्ये तृतीय आणि एकूण सातवे स्थान मिळवत अंतिम फेरीसाठी पात्र ठरला होता. त्याने  स्पर्धेच्या गेल्या हंगामात ८:२१.३७ सेकंद वेळेची नोंद करत १३वे स्थान पटकावले होते.

अविनाशने सुरुवातीचे एक किलोमीटर अंतर पार करण्यासाठी जवळपास तीन मिनिटे (२:५९.४६ से.) वेळेसह १४वे स्थान राखले होते आणि दोन किलोमीटरसाठी त्याने ५:५३.७२ से. इतका वेळ घेतला. अंतिम १०० मीटरमध्ये साबळे ११व्या स्थानावर होता.

रोहासला तिहेरी उडीत सुवर्ण

जगातील सर्वोत्तम तिहेरी उडीपटू असलेल्या व्हेनेझुएलाच्या जुलिमार रोहासने १५.४७ मीटर अंतर पार करत आपल्या तिसऱ्या जागतिक सुवर्णपदकाची नोंद केली. मात्र, जागतिक विक्रम तिला मोडीत काढता आला नाही. जमैकाची शानिएका रिकेट्सने (१४.८९ मीटर) दुसरे आणि अमेरिकेच्या टोरी फ्रँकलिनने (१४.७२ मीटर) तिसरे स्थान मिळवले.