scorecardresearch

जागतिक अ‍ॅथलेटिक्स स्पर्धा : अन्नू राणी सातव्या स्थानी

भारताच्या अन्नू राणीला शनिवारी जागतिक अ‍ॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेतील महिलांच्या भालाफेक क्रीडा प्रकाराच्या अंतिम फेरीत सातव्या स्थानावर समाधान मानावे लागले.

sp anu rani
६१.१२ मीटर भालाफेक

पीटीआय, युजीन (अमेरिका) : भारताच्या अन्नू राणीला शनिवारी जागतिक अ‍ॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेतील महिलांच्या भालाफेक क्रीडा प्रकाराच्या अंतिम फेरीत सातव्या स्थानावर समाधान मानावे लागले. तिला केवळ ६१.१२ मीटरचे अंतर गाठता आले.

जागतिक स्पर्धेत सलग दुसऱ्यांदा अंतिम फेरीत खेळणाऱ्या अन्नूने दुसऱ्या प्रयत्नात सर्वोत्तम कामगिरी केली. मात्र, इतर पाच प्रयत्नांत तिला ६० मीटरचे अंतर पार करण्यात अपयश आले. तिने ५६.१८ मी., ६१.१२ मी., ५९.२७ मी., ५८.१४ मी., ५९.९८ मी. आणि ५८.७० मी. अंतरावर भालाफेक केली. २९ वर्षीय अन्नूची हंगामातील आणि वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी ६३.८२ मी. अशी होती. हे अंतर पार केल्यास अन्नूला अंतिम फेरीत पदक जिंकता आले असते.

गतविजेत्या ऑस्ट्रेलियाच्या केलसे-ली बार्बरने ६६.९१ मी. अंतराची नोंद करत सुवर्णपदक कमावले. अमेरिकेच्या कारा विंगरने ६४.०५ मी. अंतरासह रौप्यपदक, तर जपानच्या हारूका कितागुचिने ६३.२७ मी. अंतरासह कांस्यपदक पटकावले. ऑलिम्पिक विजेत्या चीनच्या शियिंग लियूला (६३.२५ मी.) चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले. जागतिक अजिंक्यपद स्पर्धेमध्ये तिसऱ्यांदा सहभाग नोंदवणाऱ्या अन्नूने ५९.६० मी. अंतरासह अंतिम फेरीसाठी पात्रता मिळवली होती. अन्नूने दोहा येथे झालेल्या गेल्या जागतिक स्पर्धेत ६१.१२ मी. अंतरासह अंतिम फेरीत आठवे स्थान पटकावले होते.

तिहेरी उडीत एल्डहोसवर लक्ष

भारताचा तिहेरी उडीपटू एल्डहोस पॉल यांनी पहिल्यांदाच जागतिक स्पर्धेच्या अंतिम फेरीत सहभाग नोंदवला. या स्पर्धेची अंतिम फेरीत रविवारी भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी ६.३० वाजता होणार आहे. पात्रता फेरीत १६.६८ मीटर अंतर गाठणाऱ्या एल्डहोसने अ-गटातून सहावे आणि एकंदर १२वे स्थान मिळवले. त्याचप्रमाणे रविवारी पुरुषांच्या ४ ७ ४०० मीटर सांघिक रिले शर्यतीच्या पात्रता फेरीत भारतीय धावपटू सहभागी होतील.

सिडनी मक्लॉक्लनची विक्रमी कामगिरी

अमेरिकेच्या सिडनी मक्लॉक्लनने महिलांच्या ४०० मीटर अडथळा शर्यतीत ५०.६८ सेकंद वेळेची नोंद करत आपलाच जागतिक विक्रम ०.७३ सेकंद अंतराने मोडीत काढला. तिने सलग चौथा स्पर्धेत आपला विक्रम मोडण्याची उल्लेखनीय कामगिरी केली आहे. यासह जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतील पहिल्याच प्रयत्नात २२ वर्षीय मक्लॉक्लनने सुवर्णपदकाची कमाई केली. नेदरलँड्सचा फेमके बोलने (५२.२७ से.) रौप्य आणि जगज्जेत्या दालिला मुहम्मदने (५३.१३ से.) कांस्यपदक पटकावले. मक्लॉक्लन शर्यतीच्या अखेरच्या टप्प्यात पोहोचण्यापूर्वी बोल आणि मुहम्मद १५० मीटरने पिछाडीवर होत्या.

नीरजचे सुवर्ण कामगिरीचे ध्येय

भारताचा तारांकित भालाफेकपटू नीरज चोप्राकडे रविवारी सर्वाची नजर असणार आहे. गेल्या वर्षी टोक्यो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकल्यानंतर आता जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतही सुवर्ण कामगिरी करण्याचे ध्येय नीरजने बाळगले आहे. २४ वर्षीय नीरजने रविवारी अग्रस्थान मिळवल्यास ऑलिम्पिक विजेतेपदापाठोपाठ जगज्जेतेपद पटकावणारा तो तिसरा भालाफेकपटू ठरेल. याआधी नॉर्वेच्या आंद्रेस थॉर्किल्डसन (२००८-०९) आणि चेक प्रजासत्ताकच्या जॅन झेलेझनी (१९९२-९३ आणि २०००-०१ असे दोनदा) यांनी दुहेरी सुवर्ण कामगिरी केली होती. अंतिम फेरीत नीरज आणि ग्रेनाडाचा अँडरसन पीटर्स यांच्यातील द्वंद्वाकडे चाहत्यांचे लक्ष असेल.

  • वेळ : सकाळी ७.०५ वा. ’ थेट प्रक्षेपण : सोनी टेन २

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 24-07-2022 at 00:02 IST