पीटीआय, नवी दिल्ली : चालू हंगामात चमकदार कामगिरी करणाऱ्या ऑलिम्पिक विजेत्या नीरज चोप्राचे अमेरिकेच्या युजीन येथे शुक्रवारपासून सुरू होणाऱ्या जागतिक अ‍ॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत ऐतिहासिक पदक जिंकण्याचे लक्ष्य आहे. २४ वर्षीय नीरजकडून पदक मिळवण्याच्या भारताला सर्वाधिक अपेक्षा आहेत. त्याची सध्याची लय पाहता या अपेक्षांची तो पूर्तता करू शकेल. ३० जूनला स्टॉकहोम डायमंड लीगमध्ये नीरजने ८९.९४ मीटर भाला फेकत हंगामातील तिसरी सर्वोत्तम कामगिरी नोंदवली. नीरजने जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत पदक मिळवल्यास तो अशी कामगिरी करणारा केवळ दुसरा भारतीय आणि पहिला पुरुष अ‍ॅथलेटिक्सपटू ठरू शकतो. लांब उडीपटू अंजू बॉबी जॉर्जने पॅरिस येथे २००३मध्ये झालेल्या स्पर्धेत कांस्यपदक जिंकले होते. अंजू जागतिक पदक जिंकणारी पहिली भारतीय खेळाडू ठरली होती.

या स्पर्धेत नीरजसमोर ग्रेनाडाच्या अँडरसन पीटर्सचे आव्हान असेल. २०१९च्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत सोनेरी कामगिरी करणारा पीटर्स या वेळीही सुवर्णपदकासाठीचा प्रमुख दावेदार समजला जात आहे. या हंगामातील पाच सर्वोत्तम कामगिरींमध्ये चार पीटर्सच्या नावे आहेत. यात त्याच्या ९३.०७ मीटर कामगिरीचाही समावेश आहे. २०१७चा जागतिक विजेता जर्मनीचा जोहानेस वेटरने खांद्याच्या दुखापतीमुळे स्पर्धेतून माघार घेतली आहे. नीरजने हंगामात दोन वेळा पावो नूर्मी आणि कुओर्टेन स्पर्धेत पीटर्सवर मात करत अनुक्रमे रौप्य आणि सुवर्णपदक जिंकले आहे. या वेळीही त्याच्याकडून याच कामगिरीच्या पुनरावृत्तीची अपेक्षा असणार आहे.

स्पर्धेची पात्रता फेरीही आव्हानात्मक -नीरज

जागतिक अजिंक्यपद स्पर्धेमध्ये सर्वोत्तम कामगिरी करण्याचा आपला मानस असल्याने नीरजने सांगितले. ‘‘या स्पर्धेसाठी उत्तम तयारी केली आहे आणि माझा आत्मविश्वासही दुणावलेला आहे. मागील तिन्ही स्पर्धात मी कामगिरीत सातत्य राखले आहे. स्टॉकहोम डायमंड लीगमध्ये ९० मीटर अंतराचा टप्पा गाठण्यासाठी मला अवघे सहा सेंटीमीटर अंतर कमी पडले. या वेळी सर्वोत्तम कामगिरीसाठी मी प्रयत्नशील आहे. या स्पर्धेत जगातील आघाडीचे भालाफेकपटू सहभागी होणार असल्याने पात्रता फेरीही आव्हानात्मक असेल,’’ असे नीरज म्हणाला.