World Badminton Championships 2018 : चीनमध्ये सुरु असलेल्या जागतिक अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या चाहत्यांना मिश्र भावनांना सामोरे जावे लागले. एकीकडे किदम्बी श्रीकांतने आपल्या प्रतिस्पर्ध्याला नमवून स्पर्धेच्या तिसऱ्या फेरीत धडक दिली. तर दुसरीकडे प्रणॉयला ब्राझीलच्या बॅडमिंटनपटूकडून पराभूत व्हावे लागले.

भारताचा आघाडीचा बॅडमिंटनपटू किदम्बी श्रीकांत याने स्पेनच्या पाब्लो एबियन याचा पराभव केला. त्याने पाब्लोला २१-१५, १२-२१, २१-१४ असे पराभूत केले. पहिला गेम पाब्लोने २१-१५ असा जिंकला. पण पुढील गेममध्ये श्रीकांतने जोरदार ‘कमबॅक’ केला आणि २१-१२ असा गेम जिंकला. सामन्याचा तिसरा गेम निर्णायक होता. हा सामना चांगलाच रंगला पण अखेर श्रीकांतने २१-१४ असा हा गेम जिंकला आणि सामना आपल्या नावे केला.

दुसरीकडे भारताच्या एच एस प्रणॉयला पराभवाला सामोरे जावे लागले. ब्राझीलच्या यगॉर कोएल्हो याने प्रणॉयला ८-२१, २१-१६, २१-१५ असे पराभूत केले. पहिला गेम प्रणॉयने २१-८ असा सहज जिंकला. त्यावेळी पुढील दोन गेम कोएल्होच्या पारड्यात पडतील असे कोणालाही वाटले नव्हते. पण कोएल्होने अप्रतिम पुनरागमन केले आणि पुढील दोन्ही गेम २१-१६, २१-१५ असे जिंकले. या विजयामुळे कोएल्हो पुढील फेरीत गेला तर प्रणॉयला घरचे तिकीट काढावे लागले.