पीटीआय, टोक्यो : सात्त्विकसाईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी जोडीने उपांत्य फेरीत प्रवेश करताना शुक्रवारी जागतिक अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेतील भारताचे पुरुष दुहेरीतील पहिले पदक निश्चित केले. जागतिक क्रमवारीत सातव्या स्थानावर असणाऱ्या सात्त्विक-चिराग जोडीने याच महिन्यात राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत विजेतेपद मिळवले आहे. उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत सात्त्विक-चिरागने यजमान जपानच्या गतविजेत्या ताकुरो होकी-युगो कोबायाशीचे आव्हान २४-२२, १५-२१, २१-१४ असे संपुष्टात आणले. ही लढत तब्बल एक तास, १५ मिनिटे चालली. या विजयाने सात्त्विक-चिरागने आतंरराष्ट्रीय स्तरावर पहिल्या प्रतिष्ठित स्पर्धेतील पदक निश्चित केले.

भारताचे जागतिक स्पर्धेत दुहेरीतील हे दुसरे पदक ठरले. यापूर्वी ज्वाला गट्टा-अश्विनी पोनप्पाने २०११ मध्ये महिला दुहेरीत कांस्यपदक मिळवले होते. तेव्हापासून जागतिक स्पर्धेतील भारताचे हे १३वे पदक ठरले. सिंधूने दोन विजेतेपदांसह सर्वाधिक पाच पदके येथे मिळवली आहेत. सायना नेहवालने रौप्य-कांस्य, किदम्बी श्रीकांतने रौप्य आणि लक्ष्य सेन, प्रकाश पदुकोण यांनी कांस्यपदक मिळवले आहे.

सात्त्विक-चिरागची गाठ आता मलेशियाच्या सहाव्या मानांकित अ‍ॅरॉन शिया-सोह वुई यिक जोडीशी पडणार आहे. सात्त्विक-चिराग जोडीने कमालीच्या वर्चस्वाने सुरुवात केली. पहिल्या गेममध्ये भारतीय जोडी एक वेळ १२-५ अशा मोठय़ा आघाडीवर होती. मात्र याच वेळी सलग सात गुणांची कमाई करताना जपानी जोडीने १६-१४ अशी आघाडी मिळवली. अर्थात, भारतीय जोडीने जिद्दीने खेळ करत लांबलेला पहिला गेम जिंकला. दुसऱ्या गेममध्ये बरोबरीची कोंडी कायम होती, मात्र १४-८ अशा आघाडीनंतर जपानी जोडीने नियंत्रण गमावले नाही. या गेमला युगोच्या ताकदवान स्मॅश आणि क्रॉस कोर्टच्या अचूक फटक्यांनी भारतीय जोडीला हैराण केले. तिसऱ्या गेममध्ये भारतीय जोडीने ११-५ अशी झकास सुरुवात केली. पुढे त्यांनी आघाडी १९-१३ अशी भक्कम केली. सात्त्विक-चिरागने सात मॅच पॉइंट मिळवले. निर्विवाद आघाडीचे काहीसे दडपण सात्त्विकवर आले. त्याची सव्‍‌र्हिस भरकटली. मात्र युगोचा फटका नेटमध्ये अडकला आणि भारतीय जोडीचा विजय साकार झाला.

तत्पूर्वी, एमआर अर्जुन आणि ध्रुव कपिला जोडीची स्वप्नवत घोडदौड तीन वेळच्या विजेत्या मोहम्मद एहसान आणि हेंद्रा सेटिआवानने रोखली. मोहम्मद-हेंद्राने भारतीय जोडीवर २१-८, २१-१४ असा विजय मिळवला.

  • वेळ : सकाळी ६.३० वा.
  • थेट प्रक्षेपण : स्पोर्ट्स १८-१