भारताच्या मंजू राणीचं जागतिक अजिंक्यपद बॉक्सिंग स्पर्धेत, पदार्पणातच सुवर्णपदक जिंकण्याचं स्वप्न अखेरीस भंगल आहे. ४८ किलो वजनी गटात मंजू राणीला अंतिम फेरीत रशियाच्या एकातेरिना पाल्टसेवाकडून पराभवाचा सामना करावा लागला. रशियन खेळाडूने अंतिम सामन्यात पूर्णपणे आपलं वर्चस्व गाजवंल, ज्यामुळे पंचांनी एकातेरिनाच्या बाजूने ४-१ असा निर्णय दिला.

अंतिम फेरीतल्या या पराभवानंतरही मंजू राणीने ऐतिहासीक कामगिरीची नोंद केली आहे. १८ वर्षांनंतर पदार्पणात जागतिक अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश करणारी मंजू पहिली महिला भारतीय खेळाडू ठरली आहे. २००१ साली मेरी कॉमने अशी कामगिरी करुन दाखवली होती. मंजूच्या पराभवानंतर भारताचं जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतलं आव्हान संपुष्टात आलं आहे. भारताकडून मंजू राणीने रौप्य, तर मेरी कोम, जमुना बोरो आणि लवलीना यांनी कांस्य पदकाची कमाई केली.