World Boxing Championship या स्पर्धेत भारताची स्टार बॉक्सर मेरी कोम हिने स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारली आहे. उपांत्यपूर्व फेरीत तिने चीनच्या वू यु हिला ५-० असे पराभूत केले. मेरी कोमच्या या विजयामुळे तिचे जागतिक स्पर्धेमध्ये आणखी एक पदक निश्चित झाले आहे.

४८ किलो वजनी गटात तिची झुंज चीनच्या वू यु हिच्याशी झाली. या सामन्यात मेरी कोमने सामन्यावर पूर्णपणे वर्चस्व राखले. चीनच्या प्रतिस्पर्ध्याला सामन्याच्या कोणत्याही क्षणाला तिने डोके वर काढू दिले नाही. तिच्या या सुंदर खेळीमुळे तिला या सामन्यात एकतर्फी विजय मिळवता आला.

या स्पर्धेत एमसी मेरी कोमने रविवारी ४८ किलो वजनी गटाची उपांत्यपूर्व फेरी गाठताना कझाकस्तानच्या एयगेरिम केसेनायेव्हाचा ५-० असा पराभव केला होता. त्या विजयाने तिने सहाव्या जागतिक सुवर्णपदकाकडे वाटचाल करण्यास आणखी एक पाऊल टाकले होते. सध्या मेरी आणि आर्यलडची कॅटी टेलर यांच्या खात्यावर प्रत्येकी पाच सुवर्णपदके आहेत. त्यामुळे इतिहास रचण्याच्या दृष्टीने मेरी कोमची आगेकूच भारतासाठी आनंददायी ठरत आहे.