वृत्तसंस्था, नवी दिल्ली : भारताची बॉक्सिंगपटू निखत झरीनने (५२ किलो) इस्तंबुल येथे झालेल्या १२व्या महिला जागतिक अजिंक्यपद बॉक्सिंग स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई केली. जागतिक स्पर्धेत सोनेरी मोहोर उमटवणारी ती भारताची पाचवी महिला बॉक्सिंगपटू ठरली आहे.गुरुवारी झालेल्या ५२ किलो वजनी गटाच्या अंतिम लढतीत निखतने थायलंडच्या जितपोंग जुतामासचा ५-० असा धुव्वा उडवला. पाचही पंचांनी अनुक्रमे ३०-२७, २९-२८, २९-२८, ३०-२७, २९-२८ अशा गुणफरकाने निखतच्या बाजूने निकाल दिला. त्यामुळे एमसी मेरी कोम (२००२, २००५, २००६, २००८, २०१० आणि २०१८), सरिता देवी (२००६), जेनी आरएल (२००६) आणि लेखा केसी (२००६) यांच्यानंतर जगज्जेती म्हणून मिरवण्याचा मान तिने मिळवला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

निझामाबाद (तेलंगणा) येथे जन्मलेल्या निखतने अंतिम लढतीत अपेक्षेनुसार आक्रमक खेळ केला. तीन मिनिटांच्या पहिल्या फेरीत सुरुवातीपासून निखतने वर्चस्व प्रस्थापित केले. उपांत्य फेरीत तीन वेळा विश्वविजेत्या कझाकस्तानच्या झाइना शेकेर्बेकोव्हाचा पराभव करणाऱ्या जुतामासने आपल्या आक्रमणाचा वेग वाढवण्याचा प्रयत्न केला. मात्र, निखतने भक्कम बचाव करत तिचे आक्रमण परतवून लावले. दुसऱ्या फेरीतही २५ वर्षीय निखतने आपल्या उंचीचा फायदा घेतला. तिने प्रतिस्पर्धी जुतामासपासून अंतर ठेवले. त्यामुळे जुतामासने प्रतिहल्ला करण्याच्या प्रयत्नात चुका करण्यास सुरुवात केली. निखतने याचा फायदा घेत या फेरीतही आपले वर्चस्व प्रस्थापित केले.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: World boxing championship nikhat golden bloom indian boxer gold medal world boxing championships ysh
First published on: 20-05-2022 at 01:26 IST