बेलग्रेड : आशियाई विजेता संजीत (९२ किलो) आणि आकाश कुमार (५४ किलो) या भारतीयांना एआयबीए जागतिक पुरुष अजिंक्यपद बॉक्सिंग स्पर्धेत आगेकूच करण्यात यश आले. या दोघांनीही उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.

५४ किलो वजनी गटात जर्मनीच्या ओमर सलाह इब्राहिमने आजारपणामुळे माघार घेतल्याने आकाशला पुढेचाल मिळाली. ‘‘आकाशचा प्रतिस्पर्धी आजारी असल्याने वजन तपासणीसाठी उपस्थित राहिला नाही. आमच्याकडून वरिंदर सिंगच्या बाबतीतही असे घडले होते. त्या वेळी आमचे नुकसान झाले आणि आता आमचा फायदा झाला,’’ असे भारताचे उच्च कामगिरी संचालक सँटिआगो निएव्हा म्हणाले. ६० किलो वजनी गटात वरिंदरला ताप आल्यामुळे सामन्यातून माघार घ्यावी लागली होती, पण त्याच्या करोना चाचणीचा अहवाल नकारात्मक आला.

संजीतने ९२ किलो वजनी गटात रशियाच्या आंद्रे स्टोत्स्कीला ४-१ असे पराभूत केले. संजीतने या लढतीच्या पहिल्या दोन फेऱ्यांमध्ये आक्रमक खेळ करत स्टोत्स्कीवर दडपण टाकले. याचे स्टोत्स्कीला प्रत्युत्तर देता आले नाही आणि संजीत विजयी ठरला. आकाश सांगवानने (६७ किलो) जर्मनीच्या डॅनियल क्रोट्टरवर ४-१ असा विजय मिळवत उपउपांत्यपूर्व फेरी गाठली. या फेरीत त्याच्यापुढे क्युबाच्या केव्हिन ब्राऊनचे आव्हान असेल.