दुबई : मॅग्नस कार्लसन आणि इयान नेपोम्निशी यांच्यातील जागतिक अजिंक्यपद बुद्धिबळ लढतीचा सातवा डाव बरोबरीत सुटला. त्यामुळे जगज्जेत्या कार्लसनने या लढतीतील आपली आघाडी कायम राखली आहे. 

सर्वोत्तम १४ डावांच्या लढतीत सात डावांअंती कार्लसनच्या खात्यात चार गुण असून नेपोम्निशीचे तीन गुण झाले आहेत. पहिले पाच डाव बरोबरीत सुटल्यानंतर या दोघांमधील सहावा डाव तब्बल सात आणि ४७ मिनिटे चालला होता. यात १३६ चालींअंती कार्लसनला विजय मिळवण्यात यश आले. त्यामुळे सातव्या डावात तो अधिकच आत्मविश्वासाने खेळताना दिसला. मात्र, पांढऱ्या मोहऱ्यांसह खेळणाऱ्या नेपोम्निशीने त्याला चोख प्रत्युत्तर दिले. त्यामुळे हा डाव केवळ ४१ चाली आणि अडीच तासांत बरोबरीत सुटला. ‘‘आज आम्ही दोघांनीही चुका केल्या नाहीत. हा फारच संतुलित डाव झाला,’’ असे सातव्या डावानंतर नेपोम्निशी म्हणाला.