विश्वविजेत्या विश्वनाथन आनंदविरुद्ध दोन गुणांची आघाडी असल्यामुळे आत्मविश्वासाने खेळणाऱ्या मॅग्नस कार्लसन याने आठव्या डावात बरोबरी स्वीकारली आणि या दोन खेळाडूंमध्ये सुरू असलेल्या विश्व बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेत वर्चस्व राखले. कार्लसन याने ५-३ अशी आघाडी घेतली आहे. उर्वरित चार डावांमध्ये कार्लसनला पहिल्या विश्वविजेतेपदासाठी आणखी केवळ दीड गुणांची आवश्यकता आहे.
या दोन खेळाडूंमधील आठवा डाव केवळ ७५ मिनिटे चालला. जेमतेम ३३ चाली झाल्यानंतर खेळाडूंनी बरोबरी स्वीकारली. या स्पर्धेत आव्हान राखण्यासाठी उर्वरित डावांमध्ये आनंदला किमान तीन डाव जिंकणे अनिवार्य आहे. बुधवारी विश्रांतीचा दिवस असून त्याचा फायदा आनंद कसा घेतो हीच उत्सुकता आहे. नववा डाव गुरुवारी खेळविला जाणार आहे.
कार्लसन याला पांढऱ्या मोहरांच्या साहाय्याने खेळण्याची संधी मिळाली होती. त्याने राजाच्या पुढील प्याद्याने सुरुवात केली. त्याला सिसिलीयन डिफेन्सने उत्तर देण्याऐवजी आनंदने राजापुढील प्यादे पुढे करीत सुरुवात केली. सहाव्या डावात काळ्या मोहरा असतानाही कार्लसन याने बर्लिन बचाव तंत्राचा उपयोग करीत विजय मिळविला होता. आठव्या डावात आनंदने या तंत्राचा उपयोग करण्याचा प्रयत्न केला. चौथ्या चालीस कार्लसनने कॅसलिंग केले, तर आनंदने आठव्या चालीस कॅसलिंग केले.
कार्लसन याने थोडीशी व्यूहरचना बदलण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यास आनंदने समर्पक उत्तर दिल्यामुळे कार्लसन याने पुन्हा नवीन डावपेच करण्याचा धोका पत्करला
नाही.
त्याऐवजी त्याने नियमित चाली करीत हा डाव बरोबरीत सोडविण्याच्या उद्देशानेच चाली केल्या. दोन्ही खेळाडूंनी एकमेकांचे मोहरे घेतले. २१ व्या चालीस दोन्ही खेळाडूंकडे प्रत्येकी एक वजीर, हत्ती व अन्य प्यादी अशी स्थिती होती. तेव्हाच हा डाव बरोबरीत सुटणार याचे चिन्ह दिसू लागले होते. त्यांनी एकमेकांचे हत्ती व वजीर घेतले. पाठोपाठ आनंदने घोडाही घेतला. २८ व्या चालीस दोन्ही खेळाडूंकडे प्रत्येकी सात प्यादी होती. त्यानंतर कार्लसन याने आणखी काही डावपेच न करता सावध खेळ करीत ३३ व्या चालीस बरोबरीचा प्रस्ताव ठेवला. आनंदनेही पराभवापेक्षा बरोबरीस प्राधान्य दिले.

या डावात कार्लसन याने सुरुवातीपासूनच बरोबरीसाठी चाली करण्यावर दिला. मी काही नवीन डावपेच करण्याचा पर्याय पाहिला. तथापि कार्लसन याच्या भक्कम बचावापुढे मला फारशी संधी मिळाली नाही. हा डाव बरोबरीत सुटल्यामुळे मी समाधानी आहे. स्पर्धेतील आव्हान टिकविण्यासाठी मला अजूनही संधी आहे. नववा डाव माझ्यासाठी महत्त्वाचा आहे आणि या डावात वेगळी व्यूहरचना करण्याचा माझा प्रयत्न राहील.
    – विश्वनाथन आनंद

मी काही वेगळी व्यूहरचना करण्यासाठी प्रयत्न केला. तथापि त्यासाठी आवश्यक असणारी स्थिती मिळाली नाही. त्यामुळे फारसा धोका न पत्करता मी डाव बरोबरीत ठेवण्यावर भर दिला. आनंदनेही त्यादृष्टीनेच चाली केल्या. दोन गुणांची आघाडी माझ्यासाठी निर्णायक आहे.
    –  मॅग्नस कार्लसन