दुबई : नॉर्वेचा जगज्जेता मॅग्नस कार्लसन आणि रशियाचा ग्रँडमास्टर इयान नेपोम्निशी यांच्यातील जागतिक अजिंक्यपद बुद्धिबळ लढतीचा पहिला डाव शुक्रवारी खेळला जाणार आहे.

मागील जागतिक अजिंक्यपदाची लढत होऊन तब्बल १०९० दिवस उलटले असून या काळात जगभरात बुद्धिबळाचा प्रसार वाढला आहे. करोनामुळे लावण्यात आलेल्या टाळेबंदीत अनेकांनी घरबसल्या ऑनलाइन बुद्धिबळ खेळण्याला पसंती दिली. त्यामुळे बुद्धिबळ या ऐतिहासिक खेळाची लोकप्रियता झपाटय़ाने वाढली असून कार्लसन आणि नेपोम्निशी यांच्यातील सर्वोत्तम १४ डावांच्या लढतीला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे.

दुबईच्या ‘एक्सो २०२०’चा भाग असलेल्या या मानाच्या लढतीचा पहिला डाव शुक्रवारी खेळला जाणार असून ही लढत तीन आठवडे (१६ डिसेंबर) चालू शकेल.  

गतविजेत्या कार्लसनने २०१३ साली जागतिक अजिंक्यपदावर साली नाव कोरले होते. त्यानंतर विश्वनाथन आनंद (२०१४), सर्गे कार्याकिन (२०१६), फॅबिआनो कारूआना (२०१८) यांनी कार्लसनला पराभूत करण्याचा अपयशी प्रयत्न केला. यंदा त्याच्यापुढे जागतिक क्रमवारीत पाचव्या स्थानी असलेल्या नेपोम्निशीचे आव्हान आहे. एप्रिलमध्ये झालेली उमेदवारांची स्पर्धा जिंकत नेपोम्निशी जागतिक अजिंक्यपदाच्या लढतीसाठी पात्र ठरला. मात्र, दशकभर जागतिक क्रमवारीत अग्रस्थानी असलेल्या कार्लसनला रोखण्यासाठी नेपोम्निशीला कारकीर्दीतील सर्वोत्तम खेळ करावा लागेल. नेपोम्निशीने याआधी कार्लसनविरुद्ध झुंजार आणि यशस्वी खेळ केला आहे. या दोघांमध्ये झालेल्या १३ लढतींपैकी चारमध्ये नेपोम्निशीने, तर केवळ एकात कार्लसनने विजय मिळवला असून आठ लढती बरोबरीत सुटल्या आहेत.