इयान नेपोम्निशीने केलेल्या चुकीचा फायदा घेत जगज्जेत्या मॅग्नस कार्लसनने जागतिक र्अंजक्यपद बुद्धिबळ लढतीच्या आठव्या डावात विजयाची नोंद केली.

पांढऱ्या मोहऱ्यांसह खेळताना मागील तीनपैकी दोन डावांत विजय प्राप्त करत कार्लसनने आपले जगज्जेतेपद राखण्याच्या दिशेने पाऊल टाकले आहे.

सर्वोत्तम १४ डावांच्या या लढतीत आठ डावांअंती कार्लसनच्या खात्यात पाच गुण झाले असून नेपोम्निशीचे तीन गुण आहेत. त्यामुळे उर्वरित सहा डावांमध्ये कार्लसनला आता केवळ २.५ गुणांची आवश्यकता आहे.

जागतिक र्अंजक्यपद लढतीच्या सात डावांत आव्हानवीर नेपोम्निशीने कार्लसनला कडवी झुंज दिली. आठव्या डावातील २१व्या चालीत मात्र त्याने चूक केली. त्यामुळे त्याने मोहरा गमावला आणि मग त्याला सावध खेळ करावा लागला. कार्लसनने विचारपूर्वक खेळ करताना आपली आघाडी वाढवली. अखेर ४६व्या चालीत नेपोम्निशीने हार पत्करली.