एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत यजमान इंग्लंडला स्पर्धेचे विजेतेपद मिळाले. दोनही संघांनी निर्धारित ५० षटकात समान धावा केल्या. सुपर ओव्हरमध्येही दोन्ही संघाच्या १५ धावा झाल्या. त्यामुळे अखेर सर्वाधिक वेळा चेंडू सीमारेषेपार पोहोचवणाऱ्या इंग्लंडच्या संघाला विश्वविजेतेपद देण्यात आले. या सामन्यानंतर इंग्लंडच्या विजयाचं ठिकठिकाणी सेलिब्रेशन केलं गेलं. त्यापैकीच एका ८० वर्षाच्या आजीने केलेल्या सेलिब्रेशनचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे.

हा पहा व्हिडीओ –

इंग्लंडमधील वेस्ट ससेक्स येथे वास्तव्यास असणाऱ्या या ८० वर्षांच्या आजी आहेत. २० वर्षांच्या ग्वेन स्टॅनब्रुक हिने आपल्या आजीचा हा व्हिडीओ शूट करून पोस्ट केला आहे. “मी माझी आजी, आजोबा आणि इतर कुटुंबियांसोबत अंतिम सामना पाहत होते. आम्ही मधल्या काळात १० मिनिटांसाठी सामना थांबवला होता, त्यामुळे आम्हाला पुढे काय होणार हे माहिती होते. पण इंग्लंडच्या विजयावर आजीची काय प्रतिक्रिया असेल याचे मला कुतूहल होते म्हणून मी तिचे शूटिंग केले”, असे ग्वेन हिने सांगितले.

दरम्यान, सामन्यात नाणेफेक जिंकून न्यूझीलंडने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. पण सलामीवीर हेन्री निकोल्स (५५) आणि टॉम लॅथम (४७) यांच्याव्यतिरिक्त कोणीही जबाबदारीने खेळ केला नाही. या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडची सुरुवात अत्यंत खराब झाली. पण बेन स्टोक्स आणि जोस बटलर या दोघांनी मोठी भागीदारी करून इंग्लंडला विजयासमीप नेले.स्टोक्सने शेवटपर्यंत तग धरून सामना सुपर ओव्हरमध्ये नेला. सुपर ओव्हरमध्येही सामना बरोबरीत (१५ धावा) सुटला, त्यामुळे मूळ सामन्यातील चौकार षटकारांच्या निकषावर इंग्लंड नवा विश्वविजेता ठरला.