क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत इंग्लंड आणि न्यूझीलंडमधील अंतिम सामन्याचा थरार अनुभवताना अनेकांच्या ह्दयाचे ठोके वाढले होते. क्षणाक्षणाला उत्कंठा वाढवणाऱ्या या सामन्यात सुपर ओव्हर सुरु असताना न्यूझीलंडचा अष्टपैलू क्रिकेटपटू जिमी नीशमच्या शालेय प्रशिक्षकांनी अखेरचा श्वास घेतला. ऑकलंडच्या ग्रामर स्कूलचे माजी शिक्षक आणि प्रशिक्षक डेव्हीड जेम्स गॉर्डन यांचे सुपर ओव्हर दरम्यान निधन झाले.

इंग्लंडच्या १६ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना नीशामने सुपर ओव्हरच्या दुसऱ्या चेंडूवर षटकार ठोकल्यानंतर डेव्हीड यांनी प्राण सोडले अशी माहिती त्यांची मुलगी लिओनीने दिली. नीशमने शाळेत असताना डेव्हीड जेम्स गॉर्डन यांच्या मार्गदर्शनाखाली क्रिकेटचे धडे गिरवले होते. क्रिकेट विश्वचषकाचा अंतिम सामना इतका रंगेल याची कोणी कल्पनाही केली नव्हती.

सामना टाय झाल्यानंतर सुपर ओव्हरमध्ये गेला. सुपर ओव्हरमध्येही दोन्ही संघांची धावसंख्या बरोबरीत होती. पण सामन्यातील सर्वाधिक चौकारांच्या नियमाच्या आधारावर इंग्लंडला विजयी घोषित करण्यात आले. हा सामना पाहताना अनेकांचे श्वास रोखले गेले होते. डेव्हीड गॉर्डन माझे शाळेतले शिक्षक, प्रशिक्षक आणि मित्र होते. तुमचे या खेळावर इतके प्रेम होते की त्यातून क्रिकेटचा प्रसार झाला. आम्ही भाग्यवान आहोत तुमच्या हाताखाली आम्हाला खेळायला मिळाले. तुम्हाला आमचा अभिमान वाटला असेल अशी अशा करतो असे नीशमने आपल्या टि्वटमध्ये म्हटले आहे. ऑकलंडच्या शाळेत शिकवताना गॉर्डन यांनी त्यांच्या २५ वर्षाच्या कारकिर्दीत नीशम, लॉकी फर्ग्युसन आणि अन्य विद्यार्थ्यांना घडवले.