ICC World Cup 2023: विश्वचषक पाकिस्तान क्रिकेट संघ: क्रिकेट विश्वचषक २०२३च्या सराव सामन्यात न्यूझीलंडविरुद्धच्या पराभवानंतर, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे माजी अध्यक्ष रमीझ राजा यांनी पाकिस्तान क्रिकेट संघावर जोरदार टीका केली. बाबर आझमच्या नेतृत्वाखालील संघाने मोहम्मद रिझवानचे शतक आणि कर्णधाराच्या ८० धावांच्या जोरावर ३४५ धावा केल्या. पण, ते पुरेसे नव्हते कारण न्यूझीलंडने ६.२ षटके शिल्लक असताना हे लक्ष्य गाठले. राजा म्हणाले की, “पाकिस्तानला हरण्याची सवय होत चालली आहे. पाकिस्तानी गोलंदाजांनी हे निदर्शनास आणून दिले की, जर गोलंदाज मोठ्या मंचावर कामगिरी करू शकले नाहीत तर संघाला ४०० पेक्षा जास्त धावा कराव्या लागतील.” अशी खरमरीत टीका त्यांनी केली.
पत्रकारांशी बोलताना रमीझ राजा म्हणाले की, “मला माहित आहे हा फक्त सराव सामना होता, पण पराभव हा पराभव असतो आणि हरणे ही सवय बनते. मला असं वाटतं पाकिस्तानला आता हरायची सवय झाली आहे. आधी ते आशिया कपमध्ये हरले आणि आता इथे. पाकिस्तानने ३४५ धावा केल्या आणि धावांचा पाठलाग करताना ते न्यूझीलंडच्या गोलंदाजीसमोर निकृष्ट ठरले. जर या खेळपट्ट्या फलंदाजीला पोषक असतील आणि तुमची अशी गोलंदाजी असेल तर मग तुम्हाला कोणीच वाचवू शकत नाही.”
पुढे समालोचक रमीझ राजा म्हणाले की, “तुम्हाला जर अशा खेळपट्ट्या भारतात मिळत असतील आणि तुमची गोलंदाजी अशीच खराब असेल तर तुम्हाला ४०० धावा कराव्या लागतील. त्यामुळे तुम्हाला तुमची रणनीती बदलावी लागेल, जोखीम घ्यावी लागेल. आम्ही पहिली १०-१५ षटके बचावात्मक खेळतो आणि नंतर गीअर्स बदलतो, हे फलंदाजीतील तंत्र देखील बदलावे लागेल.”
रचिन रवींद्र आणि परतलेल्या केन विल्यमसनच्या महत्त्वपूर्ण खेळीच्या बळावर न्यूझीलंडने शुक्रवारी विश्वचषकाच्या सराव सामन्यात ३४५ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानचा पाच गडी राखून पराभव केला. विजयासाठी ३४६ धावांचा पाठलाग करताना, न्यूझीलंडने लवकर विकेट्स गमावल्या, त्यानंतर रवींद्र (९७) आणि विल्यमसन (५४) यांनी १३७ धावा जोडून आपल्या संघाला लक्ष्य गाठण्यास मदत केली. हैदराबादमध्ये ६.२ षटक शिल्लक असताना त्यांनी हे लक्ष्य गाठले.
एकदिवसीय विश्वचषक २०२३ च्या सराव सामन्यात आज ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तानचे संघ आमनेसामने आहेत. हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर हा सामना खेळला जात आहे. या सराव सामन्यात ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानविरुद्ध ७ विकेट्स गमावत ३५१ धावा केल्या आहेत. ग्लेन मॅक्सवेलने ७१ चेंडूत ७७ धावांची खेळी खेळली. या खेळीत ६ षटकारांचा समावेश होता. कॅमेरून ग्रीनने ४० चेंडूत ५० तर जोश इंग्लिशने ३० चेंडूत ४८ धावा केल्या. पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज हारिस रौफने ९ षटकांत ९७ धावा दिल्या.