पॅरिस : अभिषेक वर्मा आणि ज्योती सुरेखा वेन्नम या भारतीय जोडीने शनिवारी विश्वचषक तिरंदाजी स्पर्धेच्या तिसऱ्या टप्प्यातील कंपाऊंड प्रकाराच्या मिश्र सांघिक गटात सुवर्णपदक पटकावले. अभिषेक-ज्योती या आघाडीच्या जोडीने फ्रान्सच्या जिन बोल्च आणि ४८ वर्षीय ऑलिम्पिक पदकविजेती सोफी डोडमोंट या फ्रेंच जोडीला अंतिम लढतीत १५२-१४९ असे नमवले. यासह त्यांनी भारताला कंपाऊंड मिश्र सांघिक गटातील पहिलेवहिले सुवर्णपदक मिळवून दिले. भारताची सर्वात यशस्वी कंपाऊंड जोडी असलेल्या अभिषेक आणि ज्योतीने गेल्या वर्षीच्या विश्वचषक स्पर्धेत रौप्यपदक कमावले होते.

त्यांनी यंदा सुवर्णपदक पटकावत भारताला या स्पर्धेतील एकूण दुसरे पदक मिळवून दिले आहे. दीपिका कुमारी, अंकिता भाकट आणि सिमरनजीत कौर या भारतीय त्रिकुटाने यापूर्वीच महिलांच्या रीकव्‍‌र्ह सांघिक गटाची अंतिम फेरी गाठत आपले पदक निश्चित केले आहे.