scorecardresearch

विश्वचषक फुटबॉल स्पर्धा २१ ऐवजी २० नोव्हेंबरपासून

यजमान कतारला सलामीचा सामना खेळता यावा आणि त्यापूर्वी उद्घाटन सोहळय़ाचे आयोजन करता यावे, या हेतूने आगामी विश्वचषक फुटबॉल स्पर्धेला नियोजित तारखेपेक्षा एक दिवस आधी, म्हणजेच २१ ऐवजी २० नोव्हेंबरला प्रारंभ होणार आहे.

विश्वचषक फुटबॉल स्पर्धा २१ ऐवजी २० नोव्हेंबरपासून
संग्रहित छायाचित्र

एपी, जीनिव्हा : यजमान कतारला सलामीचा सामना खेळता यावा आणि त्यापूर्वी उद्घाटन सोहळय़ाचे आयोजन करता यावे, या हेतूने आगामी विश्वचषक फुटबॉल स्पर्धेला नियोजित तारखेपेक्षा एक दिवस आधी, म्हणजेच २१ ऐवजी २० नोव्हेंबरला प्रारंभ होणार आहे. ‘फिफा’ने शुक्रवारी याबाबतची अधिकृत घोषणा केली.

२० नोव्हेंबरला कतार आणि इक्वाडोर या संघांमध्ये दोहा येथील ६० हजार प्रेक्षकसंख्या असलेल्या अल बयात स्टेडियममध्ये आता विश्वचषकाच्या सलामीचा सामना रंगेल. विश्वचषकाला एक दिवस आधी प्रारंभ करण्याच्या ‘फिफा’च्या निर्णयाला आयोजक, दक्षिण अमेरिकन फुटबॉल महासंघ, तसेच कतार आणि इक्वाडोरच्या राष्ट्रीय फुटबॉल संघटनांनी पाठिंबा दिला आहे.

कतार येथे होणाऱ्या विश्वचषकाची कार्यक्रम पत्रिका

१ एप्रिल रोजी जाहीर करण्यात आली होती. त्या कार्यक्रम पत्रिकेनुसार, २१ नोव्हेंबरला होणाऱ्या तीन सामन्यांपैकी सेनेगल आणि नेदरलँड्स यांच्यात सलामीचा सामना रंगणार होता. मग इंग्लंड आणि इराण आमनेसामने येणार होते. अखेरचा सामना कतार आणि इक्वाडोर यांच्यात होणार होता. मात्र, या दोन सामन्यांमध्ये केवळ एका तासाचे अंतर होते आणि या वेळेत उद्घाटन सोहळा पार पडणार होता. परंतु कोणत्याही स्पर्धेच्या पहिल्या सामन्यापूर्वी उद्घाटन सोहळा होणे धार्मिक, सांस्कृतिक आणि व्यावसायिकदृष्टय़ा महत्त्वाचे असल्याचे ‘फिफा’ने काही दिवसांपूर्वी आपल्या पत्रात म्हटले होते. त्यामुळे कतार आणि इक्वाडोर यांच्यात आता स्पर्धेचा सलामीचा सामना रंगणार आहे. या सामन्यापूर्वी उद्घाटन सोहळय़ाचे आयोजन केले जाईल.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.