राउरकेला : न्यूझीलंडच्या संघाने ओडिशा येथे सुरू असलेल्या विश्वचषक हॉकी स्पर्धेत प्रतिस्पर्धी नेदरलँड्सला चकित करण्यासाठी गोलरक्षकालाच न खेळविण्याचा अजब निर्णय घेतला. परंतु त्यांना ०-४ असा पराभव पत्करावा लागला.क-गटातील न्यूझीलंड-नेदरलँड्स सामना सोमवारी बिरसा मुंडा मैदानावर झाला. आघाडीच्या फळीत एक अधिक आक्रमक खेळाडू खेळवता यावा यासाठी न्यूझीलंडने पहिल्या सत्रात गोलरक्षक डॉमनिक निक्सनला वगळले. तिसऱ्या मिनिटाला गोल स्वीकारावा लागल्यानंतरही त्यांचा हा निर्णय कायम राहिला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गोलरक्षकाशिवाय खेळणाऱ्या न्यूझीलंडवर नेदरलँड्सने लगोलग दुसरा गोल केला. त्यानंतर पेनल्टी कॉर्नर हुकला. न्यूझीलंडच्या निर्णयाने हॉकीतज्ज्ञ आवाक झाले आणि याची तुलना १९९२च्या एकदिवसीय क्रिकेट विश्वचषकातील न्यूझीलंड संघाच्या निर्णयाशी केली जाऊ लागली. त्या स्पर्धेत प्रतिस्पध्र्याना असेच चकित करण्यासाठी न्यूझीलंडचा कर्णधार मार्टिन क्रो याने नवा चेंडू ऑफ-स्पिनर दीपक पटेलच्या हाती सोपवला होता. त्या वेळी सुरुवातीची षटके फिरकीपटूंना देण्याची प्रथा नव्हती. क्रो याचा निर्णय चांगलाच यशस्वी ठरला होता. मात्र, हॉकीच्या मैदानावर गोलरक्षकास वगळण्याचा निर्णय न्यूझीलंडचा घात करणारा ठरला. नेदरलँड्सने सामना ४-० असा जिंकला.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: World cup hockey tournament new zealand lost even after the strategy amy
First published on: 17-01-2023 at 03:35 IST