इटलीचा बचावपटू जॉर्जियो चिएलिनी याच्या खांद्यावर चावा घेतल्याच्या आरोपामुळे उरुग्वेचा अव्वल खेळाडू लुइस सुआरेझवर २४ सामन्यांपासून ते दोन वर्षांची बंदी येऊ शकते. आतंरराष्ट्रीय फुटबॉल महासंघाच्या (फिफा) शिस्तपालन समितीने याप्रकरणी पुरावे गोळा करण्यास सुरुवात केली होती. सुआरेझ तसेच उरुग्वेच्या अधिकाऱ्यांना बुधवापर्यंत या प्रकरणी स्पष्टीकरण देण्याची तसेच पुरावे जमा करण्याचे आदेश फिफाने दिले होते.
‘‘शिस्तपालन समिती याविषयी लवकरत अंतिम निर्णय सुनावणार आहे. पण निर्णय सुनावण्याआधी आम्ही सर्व पुरावे गोळा करत आहोत. सुनावणी होण्याआधी सुआरेझला उरुग्वेच्या सराव शिबिरासाठी रिओ द जानिरोला जाता येणार नाही,’’ असे फिफाच्या प्रवक्त्या डेलिया फिशर यांनी सांगितले. कोलंबियाविरुद्ध शनिवारी होणाऱ्या बाद फेरीच्या सामन्यात सुआरेझ खेळू शकेल का नाही, याचा निर्णय सुनावणीनंतरच लागेल.
सुआरेझला कितपत शिक्षा होईल, या प्रश्नाचे उत्तर देणे त्यांनी टाळले. ‘‘सुआरेझला किती सामन्यांची शिक्षा द्यायची, याचा निर्णय शिस्तपालन समिती घेणार आहे,’’ असे फिशर म्हणाल्या. चावा घेतल्यानंतर रेफ्रींनी सुआरेझला लाल कार्ड न दाखवल्यामुळे चिएलिनी नाराज झाला. ‘‘तो मला चावल्याचे स्पष्ट दिसत आहे. माझ्या खांद्यावर त्याच्या दातांचे व्रण उमटले आहेत,’’ असे चिएलिनीने सांगितले.
..तरीही सुआरेझ विश्वचषकात खेळणार!
चावा घेतल्यानंतर सुआरेझ संकटात सापडला असून त्याच्यावर बंदीची टांगती तलवार आहे. फिफाने सुआरेझला बंदीची शिक्षा सुनावली तरी या बंदीविरोधात उरुग्वे फुटबॉल असोसिएशन क्रीडा लवादाकडे दाद मागेल. क्रीडा लवादाकडे हे प्रकरण गेल्यानंतर त्याचा निकाल लागण्यासाठी वेळ लागेल. त्यामुळे सुआरेझला बाद फेरीत खेळण्याचा मार्ग मोकळा होईल.