विश्वचषक मल्लखांब स्पर्धा पुढील वर्षी अमेरिकेत

मुंबईत २०१९मध्ये झालेल्या मल्लखांबच्या पहिल्यावहिल्या विश्वचषकाला खेळाडूंचा मोठय़ा प्रमाणावर प्रतिसाद लाभला.

मुंबई : दुसरी विश्वचषक मल्लखांब स्पर्धा पुढील वर्षी सप्टेंबरमध्ये अमेरिकेत होणार आहे. करोना साथीच्या पाश्र्वभूमीवर या वर्षी होणारी विश्वचषक स्पर्धा एक वर्ष लांबणीवर ढकलण्यात आल्याचे शिवछत्रपती जीवनगौरव पुरस्कार विजेते मल्लखांब प्रशिक्षक उदय देशपांडे यांनी सांगितले.

मुंबईत २०१९मध्ये झालेल्या मल्लखांबच्या पहिल्यावहिल्या विश्वचषकाला खेळाडूंचा मोठय़ा प्रमाणावर प्रतिसाद लाभला. यामध्ये भारताव्यतिरिक्त १५ देशांच्या खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. त्या विश्वचषकाच्या समारोपाच्या वेळेस पुढील विश्वचषक २०२१मध्ये न्यूयॉर्क येथे होईल, असे जाहीर करण्यात आले. परंतु जगभरात सध्या करोनाचा प्रादुर्भाव वाढत असून आंतरराष्ट्रीय प्रवासावरही र्निबध लादण्यात आले आहेत. त्यामुळे यंदाऐवजी हा विश्वचषक पुढील वर्षी सप्टेंबरमध्ये खेळवण्यात येईल.

अमेरिका मल्लखांब महासंघाने काही दिवसांपूर्वी घेतलेल्या ऑनलाइन बैठकीदरम्यान स्पर्धेच्या आयोजनाविषयीचा निर्णय घेण्यात आला. त्याशिवाय विश्वचषकाच्या दृष्टीने आवश्यक त्या टप्प्यांची माहिती या बैठकीदरम्यान सादर करण्यात आली. यामध्ये मल्लखांब ज्योत, खेळाडूंचे शिबीर आणि पथप्रदर्शन (रोड शो) यांचा समावेश असेल.

दुसऱ्या विश्वचषकात किमान ५० संघांचा सहभाग निश्चित आहे. अमेरिकेतील करोनाची स्थिती सध्या सुधारत असून पुढील वर्षांपर्यंत मल्लखांब विश्वचषकाच्या आयोजनाच्या मार्गातील सर्व अडथळे दूर होतील, अशी अपेक्षा आहे. केंद्र शासन आणि क्रीडामंत्र्यांकडून मल्लखांबाला पाठिंबा मिळत असून लवकरच जिल्हा आणि राज्य पातळीवरील स्पर्धाना प्रारंभ होईल.

– उदय देशपांडे, मल्लखांब प्रशिक्षक

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: World cup mallakhamba united states next year ssh

Next Story
रसिका , सारा , सुधांशु, आदित्य यांची विजयी सलामी
ताज्या बातम्या