साओ पावलो

गुणतालिकेत अव्वलस्थानी असलेल्या ब्राझीलने विश्वचषक फुटबॉल पात्रता फेरीत दमदार खेळ कायम ठेवताना उरुग्वेला ४-१ अशी धूळ चारली. ब्राझीलच्या चारपैकी तीन गोलमध्ये प्रमुख खेळाडू नेयमारचा सहभाग होता.

करोना उद्रेकानंतर पहिल्यांदाच स्टेडियममध्ये उपस्थित प्रेक्षकांसमोर खेळणाऱ्या ब्राझीलने सुरुवातीपासूनच उत्कृष्ट खेळ केला. १०व्या मिनिटाला नेयमारने गोल करत ब्राझीलला १-० अशी आघाडी मिळवून दिली. हा नेयमारचा ७०वा आंतरराष्ट्रीय गोल ठरला. त्यामुळे ब्राझीलसाठी सर्वाधिक ७७ गोलच्या पेले यांच्या विक्रमापासून तो केवळ सात गोल दूर आहे. राफिन्हाने १८व्या गोल करत ब्राझीलची आघाडी दुप्पट केली. उत्तरार्धात ५८व्या मिनिटाला नेयमारच्या पासवर राफिन्हाने वैयक्तिक दुसरा, तर संघाचा तिसरा गोल झळकावला. यानंतर अनुभवी लुइस सुआरेझच्या गोलमुळे उरुग्वेने ब्राझीलची आघाडी १-३ अशी कमी केली. मात्र, नेयमारच्या पासवर राखीव फळीतील गॅब्रिएल बाबरेसाने गोल केल्यामुळे ब्राझीलने हा सामना ४-१ असा जिंकला. ब्राझीलचा हा पात्रता फेरीतील ११ सामन्यांत दहावा विजय ठरला.

२५ मिनिटांच्या मध्यंतराचा प्रस्ताव

झुरिच : फुटबॉल सामन्यांच्या दोन सत्रांतील मध्यंतराचा वेळ वाढवण्याबाबत ‘आयएफएबी’ हे फुटबॉलचे कायदेमंडळ चर्चा करणार आहे. मध्यंतराची विश्रांतीची वेळ २५ मिनिटे करण्यात यावी, जेणेकरून या वेळेत मनोरंजनाच्या कार्यक्रमांचे आयोजन करता येऊ शकेल, अशी विनंती दक्षिण अमेरिकन फुटबॉल मंडळाने (कॉन्मेबॉल) केली होती. फुटबॉलचा कायदा क्रमांक ७, मध्यंतराची विश्रांती १५ मिनिटांपेक्षा मोठी नसावी असे सांगतो. मात्र, आंतरराष्ट्रीय फुटबॉल संघटनेचे नियम तयार करणाऱ्या मंडळाच्या २७ ऑक्टोबरला होणाऱ्या बैठकीत या विषयावर चर्चा करणार आहे. अमेरिकन फुटबॉल ‘एनएफएल’च्या अंतिम सामन्यात (सुपरबोल) अशा प्रकारच्या मनोरंजनाच्या कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.

अर्जेटिनाची पेरूवर मात

अर्जेटिनाने पेरूवर १-० अशी मात करत गुणतालिकेतील दुसरे स्थान भक्कम केले. लौटारो मार्टिनेझने केलेल्या गोलच्या जोरावर अर्जेटिनाने पात्रता फेरीतील सातव्या विजयाची नोंद केली. तसेच बोलिव्हियाने पेराग्वेचा ४-० असा धुव्वा उडवला. त्यांच्याकडून रॉड्रिगो रामाल्लो, मोईसेस अंगुलो, व्हिक्टर अब्रेगो आणि रोबेर्तो फर्नाडेझ यांनी गोल केले. चिलीने व्हेनेझुएलाने ३-० असे पराभूत केले.