‘वर्ल्डकपसाठीच्या संघात निवड झाली नाही तेव्हा खूप वाईट वाटलं. त्याआधीही माझं नाव वनडे आणि टी२० संघातून वगळण्यात आलं होतं. तुमच्या घरी वर्ल्डकप होतो आहे आणि तुम्हाला संघातच घेतलं जात नाही- एकदम खराब वाटतं. तेव्हा असं वाटलं- मी संघासाठी इतकं काही करते तरी निवडीसाठी विचार झाला नाही. क्रिकेट सोडून दुसरं काहीतरी करावं असंही वाटलं. मी भरकटले होते पण कुटुंबीयांनी धीर दिला. त्यांनी आत्मविश्वास वाढवला. दु:ख स्वीकारलं. माझ्या गुणकौशल्यांवर काम करायला सुरुवात केली. मी मेहनत केली, त्याचं फळ मिळालं’, अशा शब्दात वर्ल्डकपविजेत्या शफाली वर्माने आपल्या भावना व्यक्त केल्या. सलामीवीर प्रतीका रावळ दुखापतग्रस्त झाल्याने शेवटच्या दोन लढतींसाठी शफालीला संघात स्थान मिळालं. या संधीचा पुरेपूर फायदा उठवत शफालीने वर्ल्डकपच्या फायनलमध्ये ८७ धावा आणि २ विकेट्स अशी अष्टपैलू कामगिरी केली. ‘ब्रेकफास्ट विथ चॅम्पियन्स’ कार्यक्रमात बोलताना शफालीने आपल्या भावना व्यक्त केल्या.
‘भारतीय संघाचे व्यवस्थापक मारुफ सरांचा फोन आला. तुला यायचंय, देशाला वर्ल्डकप जिंकून द्यायचा आहे असं ते म्हणाले. मी तेव्हा सुरतमध्ये होतो. आता वर्ल्डकपमध्ये खेळायचं आहे याचा विचार तात्काळ सुरू केला. माझ्याकडे दोनच सामने होते. सेमी फायनल आणि फायनल. मला संघाला जिंकून द्यायचं होतं. सेमी फायनलमध्ये माझ्या धावा झाल्या नाहीत तेव्हा दोन रात्री कशा घालवल्या माझं मला माहिती. मी खूप रडलो. वर्षभर संघाबाहेर होते. निवड झाली, संधी मिळाली आणि धावाच झाल्या नाहीत. फायनलमध्ये असं खेळेन असे विचार सुरू झाले. फायनलचा दिवस आला. रडून झालं, विचार करून झाला. जे ठरवलं ते करायचं हा विचार होता. माझ्या किती धावा झाल्या आहेत हे मी पाहिलंच नाही. माझं अर्धशतक झालं तेव्हा जेमिमाने सांगितलं की बॅट उंचाव, तेव्हा माझ्या लक्षात आलं’, असं शफालीने सांगितलं.
वर्ल्डकप फायनलसारख्या दडपणाच्या सामन्यात दर्जेदार बॉलिंग करायच्या अनुभवाविषयी शफाली म्हणाली, ‘हरमनप्रीतदीदीला सांगते नेहमी की माझ्याकडून बॉलिंगचा सरावही करून घे. एका जागी क्षेत्ररक्षण करून कंटाळाही येतो. डोमेस्टिक स्पर्धेतही मी बॉलिंग करत होते. दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांची चांगली भागीदारी सुरू होती. मला बॉलिंगची संधी मिळाली. दुसऱ्याच चेंडूवर विकेट मिळाली, मला प्रचंड आनंद झाला. पाठोपाठ दुसरी विकेट मिळाली. मॅरिझान कॅप अनुभवी खेळाडू आहे. तिला आऊट केल्याचं समाधान वेगळंच होतं. तिसऱ्या ओव्हरमध्ये जास्त धावा द्यायच्या नाहीत हे डोक्यात ठेवलं. वर्ल्डकप फायनलमध्ये सामनावीर पुरस्कार मिळाला. यापेक्षा आनंदाची आणि समाधानाची दुसरी गोष्ट नाही’.
‘ऑस्ट्रेलियाच्या संघाकडून हेच शिकले आहे, शेवटच्या चेंडूपर्यंत हार मानायची नाही. कधीकधी आपल्याला अतिउत्साह नडतो. हरमनप्रीतने सांगितलं की ७ तास जीव तोडून खेळायचं आहे. फाजील उत्साही होऊ नका. ऑस्ट्रेलियाचा संघ कुठूनही पुनरागमन करू शकतो. ज्या फलंदाजांना सूर गवसला आहे त्याने मोठी इनिंग्ज खेळावी’, असं शफालीने सांगितलं.
‘देशात वर्ल्डकपचे सामने खेळायचा अनुभव अनोखा होता. जिथे जिथे खेळलो तिथे प्रचंड पाठिंबा मिळाला. चांगली कामगिरी करण्यासाठी प्रेरणा मिळाली. चाहते भरभरून प्रेम करतात. त्याने ऊर्जा मिळते. हातपाय आपोआप चालतात’, असं शफालीने सांगितलं.
