ऑस्ट्रेलियाकडून हार पत्करल्यानंतर जेतेपदाच्या शर्यतीतून बाहेर पडलेल्या भारताला शुक्रवारी हीरो जागतिक हॉकी लीग स्पध्रेतील पाचव्या ते आठव्या स्थानासाठीच्या लढतीमध्ये ऑलिम्पिक विजेत्या जर्मनीशी झुंजावे लागणार आहे. त्यामुळे भारताला चमत्काराचीच अपेक्षा करावी लागणार आहे. साखळीमध्ये भारत आणि जर्मनी यांच्यातील सामना बरोबरीत सुटला होता.
मेजर ध्यानचंद स्टेडियमवर सुरू असलेल्या आठ राष्ट्रांच्या या स्पध्रेत बुधवारी जगज्जेत्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात सुरुवातीला भारताने २-० अशी आघाडी घेतली होती. परंतु नंतर ऑस्ट्रेलियाने ७-२ अशा फरकाने भारताचा धुव्वा उडवला. जर्मनीसाठीसुद्धा ही स्पर्धा चांगली ठरलेली नाही. दुसऱ्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात त्यांनी नेदलँड्सकडून पराभव पत्करला. ‘अ’ गटातील जर्मनीच्या खात्यावर एक विजय, एक पराजय आणि एक अनिर्णीत लढत जमा होती. साखळीमध्ये भारताने जर्मनीला ३-३ असे बरोबरीत रोखले होते. त्यामुळे भारताचा या सामन्याच्या दृष्टीने आत्मविश्वास दुणावला आहे. या स्पध्रेत भारतीय संघ सामन्यातील पहिली २० मिनिटे वर्चस्व गाजवतो, हे स्पष्ट झाले आहे.