पीटीआय, पोर्ट्समाउथ

World Test Championship Final ऑस्ट्रेलियाविरुद्ध ७ जूनपासून ओव्हल येथे सुरू होणाऱ्या जागतिक कसोटी अजिंक्यपदाच्या (डब्ल्यूटीसी) अंतिम लढतीपूर्वी भारतीय गोलंदाजांच्या कार्यभार व्यवस्थापनावर लक्ष असल्याचे गोलंदाजी प्रशिक्षक पारस म्हाम्ब्रे म्हणाले.

भारतीय गोलंदाज संघातील अन्य खेळाडूंसोबत (चेतेश्वर पुजाराशिवाय) या महत्त्वाच्या सामन्यापूर्वी जवळपास दोन महिन्यांपर्यंत सुरू असलेल्या इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) सहभागी झाले होते. मोहम्मद सिराज, शार्दूल ठाकूर, अक्षर पटेल, जयदेव उनाडकट आणि उमेश यादव इंग्लंडमध्ये दाखल झाले आहेत. तर, ‘आयपीएल’ अंतिम सामन्यात गुजरात टायटन्सचे प्रतिनिधित्व करणारा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी येथे उशिराने दाखल होणार आहे. पावसामुळे ‘आयपीएल’चा अंतिम सामना रविवार ऐवजी सोमवारी खेळवण्यात आला.

मध्यक्रमातील प्रमुख फलंदाज विराट कोहलीदेखील राहुल द्रविडच्या नेतृत्वाखालील सदस्यांसह इंग्लंडमध्ये दाखल झाला. कोहलीने चेतेश्वर पुजारासह संघाच्या शिबिरात सहभाग नोंदवला. पुजारा ससेक्सकडून कौंटी अजिंक्यपद स्पर्धा खेळत असल्याने याआधीपासूनच इंग्लंडमध्ये आहे. भारतीय संघाचे ‘डब्ल्यूटीसी’ अंतिम सामन्यापूर्वी ऑरंडेल कॅसल क्रिकेट क्लबमध्ये काही सराव सत्र होण्याची शक्यता आहे.

‘‘आतापर्यंत आमची तयारी चांगली राहिली आहे. आम्ही सुरुवातीच्या सत्रात परिस्थितीशी जुळवून घेत आहोत. तसेच, गेली दोन सत्रे आमच्यासाठी चांगली राहिली. आम्ही त्यांचा कार्यभार थोडा वाढवला आहे, असे मला वाटते. येथील मैदान चांगले आहे. आमच्या अपेक्षेनुसार येथील परिस्थिती आहे. येथील वातावरण थंड आहे. पण, इंग्लंडला खेळताना अशा वातावरणाशी जुळवून घ्यावे लागते,’’ असे भारतीय क्रिकेट नियामक (बीसीसीआय) मंडळाच्या ध्वनिचित्रफितीत म्हाम्ब्रे यांनी सांगितले.

आपले लक्ष फलंदाजांच्या नजीक असलेल्या क्षेत्ररक्षकांच्या सरावासोबतच खेळाडूंच्या तंदुरुस्तीवरही आहे, असे भारतीय संघाचे क्षेत्ररक्षण प्रशिक्षक टी दिलीप यांनी सांगितले. ‘‘खेळाडू ‘आयपीएल’मध्ये सहभाग नोंदवून येथे येणार आहेत. अशातच आमच्यासाठी कार्यभार व्यवस्थापन सर्वात महत्त्वपूर्ण आहे. ‘आयपीएल’दरम्यान मैदानी क्षेत्ररक्षणावर लक्ष दिले गेले असेल. त्यामुळे आम्ही झेल पकडण्याच्या सरावावर अधिक लक्ष केंद्रित करत आहोत. त्यातच फलंदाजांच्या नजीक आणि ‘स्लिप’मधील झेल पकडण्याच्या सरावावर अधिक भर देत आहोत,’’ असे दिलीप म्हणाले. ‘‘सर्व खेळाडूंनी खूप क्रिकेट खेळले आहे. आम्हाला जो काही वेळ उपलब्ध आहे, त्यामध्ये लाल चेंडूच्या प्रारूपाशी जुळवून घेण्याचा आमचा प्रयत्न राहील,’’ असे भारताचे फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठौर यांनी सांगितले.

Story img Loader