इंग्लंडविरूद्धच्या तिसऱ्या कसोटीत भारताने दहा गडी राखून विजय मिळवला. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या सामन्यात दुसऱ्याच दिवशी पाहुण्यांचा पराभव झाला. पहिल्या डावात इंग्लंडने ११२ तर भारताने १४५ धावा केल्या. त्यानंतर दुसऱ्या डावात इंग्लंडचा डाव ८१ धावांत आटोपला आणि भारताला ४९ धावांचे आव्हान मिळाले. हे आव्हान सलामीवीर रोहित शर्मा (२५*) आणि शुबमन गिल (१५) यांनी सहज पूर्ण केले. या पराभवासह इंग्लंडचा विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा प्रवास संपुष्टात आला. आता न्यूझीलंडसोबत अंतिम सामना खेळण्याची संधी भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोनपैकी एका संघाला मिळणार आहे.

असं आहे समीकरण…

न्यूझीलंडचा संघ आधीपासूनच विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी पात्र ठरला आहे. आता न्यूझीलंडविरूद्ध कोणता संघ खेळणार याकडे साऱ्यांचे लक्ष आहे. भारत-इंग्लंड चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारत २-१ने आघाडीवर आहे. ही मालिका जिंकली असती तर इंग्लंडला अंतिम फेरी खेळण्याची संधी होती, पण आता ती शक्यता संपुष्टात आली. आता भारताने पुढचा सामना जिंकला किंवा अनिर्णित राखला तरच भारताला विश्व अजिंक्यपद स्पर्धेची अंतिम फेरी खेळायला मिळणार आहे. याउलट इंग्लंडने उर्वरित एक कसोटी जिंकली तर भारत स्पर्धेबाहेर होईल आणि ऑस्ट्रेलियाला अंतिम फेरीचं तिकीट मिळेल.

अशी रंगली तिसरी कसोटी

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारणाऱ्या इंग्लंडचा पहिला डाव ११२ धावांत आटोपला. त्यात केवळ झॅक क्रॉलीने अर्धशतक केले. तर अक्षर पटेलने ३८ धावांत ६ बळी टिपले. त्यानंतर भारताचा पहिला डावही स्वस्तात संपला. रोहितच्या अर्धशतकाच्या जोरावर भारताला कशीबशी १४५ धावांपर्यंत मजल मारणं शक्य झालं. कर्णधार जो रुटने अवघ्या ८ धावा देत ५ गडी टिपले. इंग्लंडचा दुसरा डावही लवकर संपुष्टात आला. अक्षरचे ५ तर अश्विनचे ४ बळी यांच्या जोरावर इंग्लंड ८१ धावांत गारद झाला. त्यानंतर चौथ्या डावात भारताने बिनबाद विजयासाठी आवश्यक असलेलं लक्ष्य गाठलं. सामन्यात ११ बळी टिपणारा अक्षर पटेल सामनावीर ठरला.